महाआरोग्य शिबिर नागरिक व भाविकांच्या सेवेसाठी : सर्वांनी लाभ घ्यावा

0
13

पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे आवाहन

 धाराशिव दि 28 :  सर्वसामान्य नागरिकाला महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सुविधा व सेवा उपलब्ध व्हावी तसेच राज्यातील कर्नाटक,तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यातून पायी चालत येणाऱ्या भाविकांना तुळजापूर येथे आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.या महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा.असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी केले.

आज तुळजापूर येथे महाआरोग्य शिबीरस्थळी प्रा.डॉ. सावंत बोलत होते.सोलापूर रोडवरील घाटशीळ पायथा येथे 27 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबिराच्या पाहणीसाठी तसेच आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक आणि रुग्ण व भाविकांशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला.

  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत,माजी जिल्हा परिषद सभापती प्रा.शिवाजी सावंत,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.शब्बीर अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

  पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले की, या आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या व आभाकार्ड नोंदणी आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा कन्सल्टेशन तज्ञ व आयुष सेवा देण्यात येत आहेत.महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत.सर्वसाधारण तपासणी, औषधी वाटप,ईसीजी,अस्थिरोग, सोनोग्राफी,टू डी इको,शल्य चिकित्सा मदत कक्ष,कर्करोग, मूत्ररोग व प्लास्टिक सर्जरी यासारख्या सुपर स्पेशलिटी विभाग तसेच नेत्ररोग विभाग,मोफत चष्मे वाटप, कान, नाक, घसा विभाग,मानसिक आजार विभाग,आयसीयू तसेच एक्स-रे काढण्याचीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत असे सांगितले.

  राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे.त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकास पायाभूत आणि आवश्यक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाकडून अनेक योजना आखल्या आणि राबविल्या जात आहेत.पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या यात्रेत “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” या अंतर्गत पंढरपूर महाआरोग्य शिबिरामध्ये 11 लाख 64 हजारपेक्षा जास्त वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली होती.त्याच धर्तीवर तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने ” उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याच्या ” अंतर्गत तुळजापूर येथे येणाऱ्या सर्व भाविक भक्त आणि इतर नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहनही पालकमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी प्रास्ताविकातून 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये आरोग्य सेवेचा लाभ घेतलेल्या भाविकांबद्दल माहिती दिली. 35 हजार 557 महिला व पुरुष भाविकांनी या शिबिराचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत 734 भाविकांवर उपचार करण्यात आले आहे.अडीच हजारपेक्षा जास्त भाविकांच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी,टू डी इको,ईसीजी व इतर चाचण्या करण्यात आल्या आहे.डेंटल व्हॅन व मोबाईल मेडिकल युनिटमार्फत एक्स-रे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी इत्यादी सुविधांचा 500 पेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतला आहे.12 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवातही आरोग्य विभागाकडून तुळजापूर शहरामध्ये व यात्रा मार्गांवर सर्व प्रकारचे उपचार,प्रथमोपचार आणि संदर्भ सेवा देण्यात आल्याचे डॉ. हरिदास यांनी सांगितले.

ओरल कॅन्सरची पूर्वसूचना देणारे यंत्र कार्यान्वित

तंबाखू गुटखा,सिगारेट अशा प्रकारच्या उत्पादनांच्या सेवनामुळे भारतात मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अतिशय जास्त आहे.सुरुवातीलाच या रोगाचे निदान झाल्यास अशा रुग्णांना वेळेवर उपचार दिल्यास ते पूर्ण बरे होऊ शकतात.त्यासाठीच महाआरोग्य शिबिरात तात्काळ ओरल कॅन्सर (तोंडाचा/ मौखिक कॅन्सर) आधीच डिटेक्ट करणारा यंत्र दंतरोग विभागात (29 नंबर) कार्यान्वित करण्यात आला आहे.तेव्हा याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.मनीषा सारडा यांनी केले.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष कौतुक

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांचे विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शारदीय नवरात्र महोत्सवातही अतिशय उत्कृष्ट नियोजन करून भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.या कालावधीत कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही.याचे श्रेय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना जात असल्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत म्हणाले.तसेच त्यांनी सर्व आरोग्य सेवक,अधिकारी व कर्मचारी यांचेही कौतुक केले.कार्यक्रमाचे संचलन ऐश्वर्या हेबारे यांनी केले.