Home मराठवाडा महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिला बचत गटांनी करावी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

छत्रपती संभाजीनगर, दि.29:- महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र सभागृहामध्ये आज महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांचा मतदार जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला बचत गटांचे अध्यक्ष, सचिव सदस्य उपस्थित होते. तसेच ‘स्वीप’ चे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, उपायुक्त पांढरे, स्वप्निल सरदार, गटशिक्षण अधिकारी श्रीमती थावरे यांच्यासह विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला मतदारांची संख्या ५०% पेक्षा जास्त आहे. मतदानामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये किंवा सुविधा अभावी मतदान करता आले नाही; ही सबब राहू नये म्हणून  निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाळणाघर, महिला  मतदान केंद्र, मतदान सहायता कक्ष त्याचप्रमाणे  पिण्याचे पाणी,  उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली इ. व्यवस्था करण्यात येत आहे.

शहरातील महिलांना मतदानासाठी  सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बँक सखी, अशा वर्कर, बचत गटाच्या सदस्य, लघुउद्योग, महिला गृह उद्योग यातील सर्व महिलांना मतदानात सहभाग घेण्याचे आवाहन करावे.  कार्यशाळा, प्रशिक्षण उपक्रम व इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी मतदान करण्याबाबत  आवाहन करण्यात याव,.असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुचित केले.

मतदान केंद्रावर पाळणाघर सुविधा पुरविण्यात महिला बालविकास विभागाची महत्त्वाची भूमिका

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विशेषतः ज्या स्तनदा माता, लहान बाळ असणाऱ्या माता आहेत. त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणा घर सुविधा द्यावयाची आहे. हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पार पाडावयाची आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

मतदान केंद्रांवर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात  आली होती. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मतदान केंद्रावर मतदान करतांना कडेवर असलेले बाळ सांभाळून रांगेत उभे राहणे गैरसोईचे होऊ शकते. त्यासाठी तितका वेळ त्यांची बालके सांभाळण्यासाठी पाळणाघर स्थापित करण्यात येईल. मतदान केंद्राच्या इमारतीत हे पाळणा घर असेल. तेथे महिला व बालविकास विभागाची महत्त्वाची जबाबदारी असेल. तसेच, महिला बालकल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदार जाणीव जागृतीच्या माध्यमातुन  मतदानाचे महत्त्व लक्षात आणून द्यावे. जिल्ह्यात काही ठिकाणी महिला मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. ही मतदान केंद्र पूर्णतः महिला अधिकारी कर्मचारी संचलित करतील,असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version