परभणी : शहरातील एका औषधी व्यवसायिकास अज्ञातांनी फोन करुन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास नातू आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर प्रकरणी (Parbhani Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, नवा मोंढा पोलीस ठाण्यात एका औषधी व्यापार्याने तक्रार दिली होती. आरोपींनी त्यांना फोन करुन खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास मुलगा, नातवाला जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापार्याला विश्वास बसावा म्हणून त्यांच्या मोबाईलवर फोटो देखील टाकले. सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्थागुशाला तपास करण्याचे आदेश दिले. पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पथके तयार करण्यात आली.