पुसद : लकवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. पुसद विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षा तर्फे प्रदेश लीगल सेल अध्यक्ष एड. आशिष देशमुख व आदिवासी नेते पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव वैद्य इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक आदिवासी नेते रंगराव काळे व विकास जामकर, बंजारा समाजाचे युवा नेते विशाल जाधव तर काँग्रेस पक्षातर्फे डॉ. मोहम्मद नदीम काँग्रेसचे अनिल शिंदे हे इच्छुक आहेत.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस( श.प.) पक्षाच्या तालुका कार्यालयाचे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी एड.आशिष देशमुख यांना पुसद विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी शिफारस केली.त्यामुळे व्यासपीठावरील महाविकास आघाडीच्या अन्य पक्षाच्या इच्छुक नेत्यांमध्ये खळबळ उडाली. मी कसा इच्छुक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न सोशल मीडिया व बॅनर लावून केला जात आहे.
बैठकीत उपस्थित इच्छुक नेत्यांशिवाय बाहेरून आलेल्या अन्य कोणत्याही नेत्याला महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाने तिकीट देऊ नये असेही मत एका सुरात व्यक्त करण्यात आले. यावेळी एड.आशिष देशमुख माधवराव वैद्य, रंगराव काळे, सुरेश धनवे, सामाजिक कार्यकर्ते अशोक बाबर, मोहन विश्वकर्मा इत्यादी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गांभीर्याने समारोप होणाऱ्या सभेत मात्र आभार प्रदर्शन वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडून तो चव्हाट्यावर आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक चे महासचिव सय्यद इस्तियाक व जेष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद नदिम यांच्यामध्ये खालच्या पातळीवर विश्रामगृहाच्या गेटवरच वाद निर्माण झाला. मोठमोठ्याने आवाज काढीत या नेत्यांनी बैठकीचे तीन 13 वाजविले.