राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय वृद्ध काळजी दिवस कार्यक्रम

0
13
परभणी, दि. 1 : जिल्हा रुग्णालय परभणी येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 1 ऑक्टोबर “आंतरराष्ट्रीय वृद्ध काळजी दिवस” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, हृदयरोग तज्ञ डॉ. दीपक कुबडे, चिकित्सक डॉ. दत्ता खरवडे उपस्थित होते व त्यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांस मार्गदर्शन केले.
अधिष्ठाता डॉ. भिसे यांनी जिवनात आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, दिवस भरात किमान एक तास तरी, तसेच झोप वेळेवर आणि व्यवस्थित (7-8 तास रात्रीची झोप) अशी जीवनशैली असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर हृदयरोग तज्ञ डॉ. कुबडे यांनी वय वर्षे 50 व अधिक असणाऱ्या जेष्ठ नागरिक यांनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालय मध्ये होणारे मोफत आरोग्य तपासणी व उपचार यांचे जास्तीत जास्त जेष्ठ नागरिक यांनी फायदा करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सूत्र संचालन समुपदेशक किशोर नंद यांनी केले तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा मालपानी (जेथलिया) यांनी केले. तसेच उपस्थित जेष्ठ नागरिक यांना माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले.