नियोजित कामांच्या मान्यतेची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

0
14
परभणी, दि. 4  :- चालू वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा विकास कामांवर खर्च करण्यासाठी कमी कालावधी उरला आहे, त्यामुळे विभागप्रमुखांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून विकास कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महानगर पालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे आदींसह विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर नियतव्ययानुसार विविध विकास कामे विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन विकास कामे सुरु करावीत. मंजूर संपूर्ण निधीचा विनीयोग करावा. निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. पुढील 2025-2026 या वर्षाचा आराखडा हा दि. 6 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा. सर्व विभागांनी आयपास प्रणालीचा वापर करूनच कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत सन 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील कामांचाही आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले.