बांबू लागवडीसाठी सर्वोतापरी प्रयत्न करणार
लोदगा येथे पर्यावरण योद्ध्यांचा सन्मान
लातूर, दि. १४ : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार हमी योजना विभाग काम करीत आहे. यासाठी आगामी काळात बांबू लागवड, फळबाग लागवड आणि पांदण रस्ते कामांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी लोदगा येथे झालेल्या पर्यावरण योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रमात सांगितले. तसेच बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, विभागीय वन अधिकारी अमित जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, रोहयोचे गुणनियंत्रक राजेंद्र शहाडे, फिनिक्स फाऊंडेशनचे समन्वयक परवेज पाशा पटेल, संजय कर्पे यावेळी उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यावर आपला भर राहणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी लवकरच प्रत्येक जिल्ह्यात जावून आढावा घेण्याचे नियोजन आहे. यामध्ये बांबू लागवड, फळबाग लागवड, पांदण रस्ते यासह वैयक्तिक लाभाच्या कामांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल, असे ना. गोगावले म्हणाले.

कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घेतला असून पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करण्यासाठी बांबू लागवड फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त बांबू लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येतील. बांबू लागवडीतून पर्यावरण रक्षणाला मदत होणार असून यासाठी अधिकाऱ्यांनीही सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे, अशा सूचना ना. गोगावले यांनी दिल्या.

पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. जमिनीची धूप थांबविण्यासाठीही बांबू लागवड फायदेशीर ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसोबतच बांबू लागवडीचा पर्याय निवडण्याची आवश्यकता असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
गरीब शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा स्त्रोत निर्माण होवून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी बांबू लागवड करण्याला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल झाला आहे. त्याचे दुष्परिणाम अतिवृष्टी, हिमवृष्टी यासारख्या घटकांतून स्पष्ट होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी बांबू लागवड फायदेशीर आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत बांबू जवळपास ३५ टक्के अधिक कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बाहेर सोडतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बांबू लागवडीवर भर देण्याची गरज आहे. थर्मल प्लॅन्टमध्ये कोळशासोबत बांबूचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे बांबूची मागणी वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात बांबू पिकाला चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याचे कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

बांबू लागवडीत योगदान देणाऱ्या पर्यावरण योद्ध्यांचा सन्मान
बांबू लागवड करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावणारे शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन, सहकार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांचा यावेळी रोहयो मंत्री ना. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. उदगीर तालुक्यातील जकनाळ येथील अमोल मांडमुले, चिगळी येथील मनोहर पाटील, देवणी तालुक्यातील तळेगाव रतन कोनाळे, म्हाळंगी येथील शिवाजी एकवाड या शेतकऱ्यांसह शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी ग्रामपंचायत, कराडखेल ग्रामपंचायत, ढोणा ग्रामपंचायत, शिरूर अनंतपाळ पंचायत समिती, जळकोट पंचायत समिती, उदगीर पंचायत समिती, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा यामध्ये समावेश होता.