
परभणी, दि. १९ – वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप “खरीप पीक परिंसंवाद व कृषि प्रदर्शन” आज विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात उत्सहात संपन्न झाले.
अन्नप्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित केले जाईल, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
खरीप पीक परिंसंवाद व कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर महाराष्ट्र शासनाचे माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट, विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश अहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, विभागीय कृषी संचालक प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दौलत चव्हाण, प्रगतशील शेतकरी दादा लाड, चंद्रकांत वरपूडकर, सुधीर अग्रवाल, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विद्यार्थी कल्याण अधिकारी, मुख्य शिक्षण विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष पुढाकार घेत विद्यापीठाने ५०० शेतकऱ्यांना दत्तक घेतले आहे. त्यांची प्रगती साधण्यासाठी विज्ञानाधिष्ठित शेतीतंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी त्यांना दत्तक घेऊन मार्गदर्शन करणे आवश्यक होते. विद्यापीठाने ही भूमिका स्वीकारल्याबद्दल मी विशेष आनंद व्यक्त करते. यावेळी त्यांनी प्रगतशील शेतकरी दादा लाड तसेच मथुरा येथील यशस्वी शेतकरी सुधीर अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यापीठाच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. महिलांचा शेती व्यवसायातील सहभाग आणि त्यांच्या कुटुंब उभारणीमधील महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, हे वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित असावे. परभणी शक्ती सारखी वाणे, आधुनिक तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य व्हावे. नैसर्गिक आपत्तीवर मात करत अधिक उत्पादन घेण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. केंद्र शासनाची ‘पी. एम. सन्मान योजना’ आणि राज्य शासनाचे विविध उपक्रम हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जिओमार्टसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये यश संपादन केले आहे. हेच यश परभणी जिल्ह्यातही दिसावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी परभणी जिल्ह्यात १०० लघु व मध्यम उद्योग उभारण्याचा संकल्प केला आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित करायचे असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडूनच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठ हे शेतकऱ्यांना ‘शेतकरी देव भव:’ मानून कार्य करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना नवतंत्रज्ञानाची जोड देणे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केले. परभणी येथे पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० शेतकऱ्यांसोबत कार्य करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन यावेळी त्यांनी केले. या उपक्रमात शेतकऱ्यांना तांत्रिक मदत, प्रशिक्षण आणि संशोधनाधारित उपाययोजना पुरवण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी जाहीर केले की, चालू वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे. महिलांच्या शेतीतील योगदानाची दखल घेत त्यांना आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण पुरवले जाणार आहे. परभणी शक्तीसारखी आधुनिक वाणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस विद्यापीठाने व्यक्त केला आहे. विद्यापीठाने विविध कृषी संशोधनातून परभणीचे नाव देशभर पोहोचवले आहे. तीळ, करडई, थोर, सोयाबीन यांचे नवे वाण तयार करून त्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रसारण करण्यात आले आहे. परभणी शक्ती या पोषण जैव संपृप्त वाणासह दोन बाजरीचे जैव-वाणही विकसित केले आहेत. सोयाबीनच्या बियाण्याच्या अडचणी सोडविल्याचे कौतुक जबलपूर येथील बियाणे संचालकांनी केले असून, परभणीत दीड कोटी रुपयांचे बियाणे हब सरकारमार्फत मंजूर झाले आहे. विद्यापीठाने विकसित केलेला तुरीचा गोदावरी वाण महाराष्ट्रासह इतर राज्यांतही लोकप्रिय असून, तो ‘लखपती वाण’ म्हणून ओळखला जात आहे. देशातील एकमेव ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र परभणीत सुरू असून, अलीकडेच २६ विद्यार्थ्यांची पहिली बॅच यशस्वीरीत्या प्रशिक्षित झाली आहे. हे केंद्र कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे. विद्यापीठाने आतापर्यंत ६५ कोटी रुपयांचा बाह्य निधी मिळवून विविध संशोधन प्रकल्प उभारले आहेत. नवे शैक्षणिक धोरण अवलंबून शैक्षणिक गुणवत्ता व नाविन्यपूर्ण संशोधन वाढवले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद आयोजित करून विद्यापीठाची विश्वासार्हता सिद्ध केली आहे.दर आठवड्याला दोन वेळेस ऑनलाइन ‘शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित करून शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित उपाय दिले जातात. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विशेष संवाद सत्र घेतले जाते. “अन्नसुरक्षेसाठी सक्षम शेतकरी आवश्यक आहेत. शेतीला आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षणासारखेच महत्त्व देऊनच आपण सशक्त राष्ट्र निर्माण करू शकतो,” असे सांगत माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या समर्पित कार्याचा आढावा दिला.
माजी कृषि आयुक्त उमाकांत दांगट यांनी नमूद केले की, या विद्यापीठाने मला योग्य संस्कार आणि जीवनमूल्य दिले. त्यामुळेच मी परभणीपासून महाराष्ट्रातील विविध पदांवर यशस्वीपणे कार्य करू शकलो. हे विद्यापीठ म्हणजे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. मी येथे घडलो आणि धन्य झालो,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा करत शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकारांचे कौतुक केले.“अन्नसुरक्षेच्या क्षेत्रात या विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. मात्र, आता नव्या आव्हानांसाठी विद्यापीठ सज्ज राहणे आवश्यक आहे. हवामानातील बदल, जागतिक तापमानवाढ, उत्पादनातील वाढ असूनही बाजारभावाच्या समस्येसाठी प्रभावी विपणन व्यवस्था आणि मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्याची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. “सध्या विद्यापीठात संख्यात्मक वाढ दिसून येते. मात्र, आता गुणवत्तेवर भर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत,” अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे सांगत, संशोधन, शिक्षण, आणि विस्तार कार्य या तिन्ही अंगांनी विद्यापीठ प्रभावीपणे पुढे जात आहे. हे नेतृत्व विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे,” असे त्यांनी उद्गार काढले.
तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले असून, एकाच ठिकाणी तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यावर आधारित चर्चा करण्यात आली. तसेच परिसंवादात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध खरीप पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भरड धान्यांचे महत्त्व, तसेच कीड व रोग व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश होता. यावेळी शेतकरी बांधवांच्या कृषी विषयक शंकांचे निरसन करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमात शेती उद्योगात मार्गदर्शक असलेले प्रगतशील शेतकरी चंद्रकांतदादा वरपूडकर तसेच कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या शेती उद्योगांमध्ये प्रगती केली असे प्रगतशील शेतकरी वैशालीताई घुगे, जयकिसन शिंदे, रवी दाभाडे, राहुल कव्हर, ज्ञानेश्वर देशमाने, जनार्दन सूर्यवंशी, प्रसाद इंगोले, योगकुमार श्रीखंडे या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला
याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ विकसित बियाणे विक्रीचे उदघाटन करण्यात आले. सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव, डॉ. अरुण गुट्टे यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. मेळाव्यास शेतकरी बांधव, महिला शेतकरी, कृषी विस्तारक, विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.