100 दिवस कृती आराखडा उपक्रम,परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालय विभागात तृतीय

0
14
योग्य नियोजन व कर्मचा-यांच्या परिश्रमामुळे मिळाले यश – उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे
परभणी दि. 19  : राज्य शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मुल्यमापन 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर विभागातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या मोहिमे अंतर्गत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणे, नागरिकांना वेळेवर सेवा देणे आदी विविध घटकांचा आधारित मूल्यांकन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे. योग्य नियोजन कर्मचा-यांचे परिश्रम यामुळेच हे यश मिळाल्याचे उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी सांगितले.
राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मुल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 100 दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयापैकी सर्वोत्तम कमगिरी करणा-या तीन उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये अंतिम परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. ई-प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, कार्यालयीन सोयी व सुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने परभणी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना हे यश प्राप्त झाले आहे.
या यशाचे श्रेय परभणी उपविभागीय व तहसिल कार्यालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांचे आहे. वेळोवेळी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन व तहसिलदार परभणी यांचे सहकार्य लाभले आहे. लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले. यापुढेही असेच काम अविरत सुरु राहील. नागरिकांना मिळणा-या शासकीय सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, परभणी सदैव प्रयत्नशील राहील, असे उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी सांगीतले.