लातूर जिल्ह्यातील बालगृहातील २८ बालकांची इयत्ता दहावी, बारावी परीक्षेत चमकदार कामगिरी

0
13
· मुरुड बालगृहातील भावना देशमुखला दहावीमध्ये ९६.४० टक्के गुण
लातूर, दि. २४: महिला व बाल विकास विभागामार्फत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शासकीय, स्वंयसेवी संस्थामधील अनाथ, निराधार, निराश्रीत बालकासाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. लातूर जिल्ह्यातील बालगृहातील २५ बालके इयत्ता दहावीमध्ये आणि ३ बालके इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झाली आहेत. या सर्व बालकांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मुरुड येथील शासकीय बालगृहातील भावना वसुधा देशमुख हिने इयत्ता दहावीमध्ये ९६.४० टक्के, तर लातूर एसओएस बालग्राम येथील कृष्णा ज्ञानेश्वंर बिरादार याने ८४.४० टक्के गुण प्राप्त केले. अतिशय बिकट परिस्थितीतही हार न मानता या मुलांनी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या बालकांनी दाखविलेली उमेद कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यावेळी म्हणाल्या.
लातूर जिल्ह्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील मुलांच्या यशामागे, त्यांची मेहनत बालगृहातील अधिक्षक, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी घेतलेले योगदान अमूल्य आहे. बालगृहातील या मुलांना शिक्षणासोबत प्रेम जिव्हाळा आधार आत्मविश्वास देण्याचे काम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत केले जात आहे. अनाथ निराधार मुलांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सदैव हे कार्यालस तत्पर राहील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी यावेळी सांगितले.