भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी रेंजरला अटक;बीएसएफने घेतलं ताब्यात

0
28

नवी दिल्ली:-पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं अनेक राजनैतिक निर्णय घेतले आहेत. त्यातच आता भारत- पाकिस्तान सीमेवर एका पाकिस्तानी रेंजरला अटक करण्यात आली आहे. हा पाकिस्तानी रेंजर राजस्थानमधून सीमा ओलांडून भारतात प्रवेश करत असतानाच ‘बीएसएफ’नं त्याला लगेच अटक केली असल्याची माहिती ‘पीटीआय’नं दिली.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एक पाकिस्तानी रेंजर राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवरुन भारतात घुसखोरी करत असताना त्याला ‘बीएसएफ’च्या जवानांनी अटक केली आहे. हा पाकिस्तांनी रेंजर भारतात घुसखोरी करत काही घातपात करणार होता का? अजून काही पाकिस्तांनी रेंजर्स या भागात आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अटक केलेल्या पाकिस्तांनी रेंजरकडून मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान फ्रंटियरच्या बीएसएफ यूनिटने या पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, तो भारतीय सीमेत कसा आला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.