भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांना अखेर आणीबाणी जाहीर करावी लागली आहे. यातूनच स्पष्ट दिसून येते आहे की, पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचंड हादरून गेलाय.
जम्मू-कश्मीरच्या (Pahalgam Terrorist Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती आहे. भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी ‘भारत हल्ला करणार नाही, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत’ अशी वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री मरियम नवाझ (Maryam Nawaz) यांनी आता प्रांतात आणीबाणीची घोषणा केली आहे.
या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये तात्काळ बंद करण्यात आली आहेत. स्थानिक विमानतळांवरील उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनाने संपूर्ण प्रांतात हाय अलर्ट जाहीर केला आहे. इतकंच नव्हे तर सर्व रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या असून, त्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने पाकिस्तानमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबावर हल्ला
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केवळ सामान्य दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले नाहीत तर मसूद अझहर (Masood Azhar) याच्या कुटुंबावर थेट कारवाई करत मोठा खात्मा केला आहे. या कारवाईत अझहरचा भाऊ रौफ असगर (Rauf Asghar) गंभीर जखमी झाला असून त्याचा मुलगा हुजैफा आणि पत्नी ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात अझहरच्या कुटुंबातील एकूण 14 सदस्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रौफ असगर भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.