वृत्तसंस्था/नवी दिल्ली-भारतीय जनता पक्षाने (भाजप) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
यापूर्वी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पक्ष मुख्यालयात झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. द्रौपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल होत्या. त्या आदिवासी समाजातून आल्या आहेत.मुर्मू यांचा जन्म २0 जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी या गावात झाला. त्यांच्या पतीचे नाव श्याम चरण मुर्मू आहे. अत्यंत संघर्ष करीत त्यांनी आपला राजकीय प्रवास केला आहे. ओडिशा सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. २000 आणि २00९ मध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २0१५ मध्ये त्यांना झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती.