आरबीआयला मोठा धक्का, डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांचा राजीनामा

वर्षभरात राजीनामा देणारे विश्वनाथन तिसरे उच्चपदस्थ अधिकारी ठरले

0
102

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.05 :   भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन यांनी राजीनामा दिला आहे. महागाई, जीडीपीमध्ये घसरण यांसारखी आव्हाने अर्थव्यवस्थेसमोर असताना विश्वनाथन यांचा राजीनामा आरबीआयला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, तब्येतीचे कारण पुढे करत  विश्वनाथन यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

वर्षभरात राजीनामा देणारे विश्वनाथन तिसरे उच्चपदस्थ अधिकारी ठरले आहेत. जून 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी राजीनामा दिला होता. त्यापूर्वी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता.विश्वनाथन यांच्या राजीनाम्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की 31 मार्चला विश्वनाथन हे आपले पद सोडणार आहेत. जवळपास 40 वर्षांची कारकीर्द असलेले विश्वनाथन हे जून महिन्यात निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी मुदतीआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ताणतणावामुळे आरोग्यावर परिणाम होत असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. 1981 साली आरबीआयमध्ये सेवेत रूजू झालेले विश्वनाथन हे बँकिंग क्षेत्रातील खूप जाणकार मानले जातात. विशेषकरून नियम आणि कायद्यासंबंधी त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जून महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी विश्वनाथन यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. विश्वनाथन हे बँकिंग नियमन, सहकार क्षेत्रातील बँकिंग, ठेवी विमा यासह अनेक क्षेत्रावर लक्ष ठेवून होते.