77 वर्षीय बायडेन होणार पुढील राष्ट्राध्यक्ष;अमेरिकेला मिळणार सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष

0
194

डेमोक्रॅट पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती होणार आहेत. 77 वर्षीय बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनणारे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. पेनसिल्व्हेनियात मिळवलेल्या विजयासह त्यांनी बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पार करत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. NYT नुसार, पेनसिल्व्हेनियात विजय मिळवत त्यांनी बहुमतासाठी आवश्यक इलेक्टोरल मते मिळवली आहेत. दरम्यान अद्यापही 5 राज्यांतील मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रपती पदासाठी बहुमताचा आकडा 270 आहे. बायडेन यांच्याकडे 273 इलेक्टोरल मते आहेत. दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

बायडेन यांचे ट्विट – मी सर्वांचा राष्ट्राध्यक्ष होईन

बायडेन यांनी ट्विट केले की, ”अमेरिका, मला अभिमान आहे की आपण आमच्या महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी मला निवडले. आपले भविष्यातील काम कठीण असेल, परंतु मी तुम्हाला वचन देतो की मी सर्व अमेरिकनांचा अध्यक्ष होईन. मग तुम्ही मला मत दिले असेल किंवा नसेल.”

बायडेन यांचे ट्रम्प यांना आवाहन – राग सोडा, आपण सर्व अमेरिकन

याआधी शनिवारी बायडेन लोकांसमोर आले. त्यांनी राजकीय वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ट्रम्प यांचे नाव घेता, राग सोडण्याचे आवाहन केले. आपण विरोधी असू शकतो पण शत्रू नाही. आपण सर्व अमेरिकन आहोत, असे बायडेन म्हणाले. समर्थकांना ते म्हणाले की, डेमोक्रेट निवडणूक जिंकेल यात शंका नाही. अमेरिकन जनतेने आम्हाला सरकार चालवण्याचा जनादेश दिला आहे.

बायडेन म्हणाले की, आपण संयुक्तपणे पुढे जावे अशी देशाची इच्छा आहे. तुम्ही धीर धरा. आज आम्ही तेच सिद्ध करत आहोत जे 244 वर्षांपूर्वी (1776 मध्ये) केले होते. आणि ते म्हणजे लोकशाही यशस्वी आणि प्रभावी आहे. तुमचे प्रत्येक मत मोजले जाईल. समर्थकांनी शांतता राखावी असे आवाहनही बायडेन यांनी केले.

4 दिवस चाललेल्या मतमोजणीनंतर बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

3 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यापासून निकाल स्पष्ट झालेला नव्हता. 4 दिवस चाललेल्या मतमोजणीनंतर बायडेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे चित्र स्पष्ट होईपर्यंत निवडणुकीतील घोटाळ्याच्या आरोपांची पुनरावृत्ती करत राहिले. मतमोजणीच्या खोल्यांमध्ये काही घोळ झाला आहे. चुरशीची लढत असणाऱ्या पेनसिल्व्हेनिया राज्यात हजारो मते चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांचे 3 ट्विट

ट्रम्प म्हणाले – गेल्या दोन-तीन दिवसांत संख्या (मतमोजणी) कशी वाढत आहे याचे आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे.

ट्रम्प यांचा दावा – निवडणुकीच्या रात्री मी सर्व राज्यात आघाडी घेत होतो. जसजसे दिवस गेले तसतसे या आघाडी कमी होत गेल्या. जशी कायदेशीर प्रक्रिया पुढे जाईल, बहुतेक आमची लीड देखील वाढेल.

ट्रम्प म्हणाले – जो बिडेन यांनी राष्ट्रपती कार्यालयावर चुकीचा दावा करु नये. मी देखील असा दावा करू शकतो. कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.