
गोंदिया. सत्तेत आल्यापासून सतत विदर्भावर अन्याय करणाऱ्या विदर्भद्वेषी सरकारला येत्या १ डिसेंबरला बॅलेटच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवा, असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. सुनील मेंढे यांनी केले.
भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ), बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांनी सोमवारी (ता.२३) गोंदिया जिल्हा संपर्क दौरा केला. यावेळी विविध ठिकाणी झालेल्या सभेमध्ये खासदार सुनील मेंढे बोलत होते.
गोंदिया जिल्हा संपर्क दौऱ्यादरम्यान अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी, आमगाव, फुलचूर, गोंदिया, तिरोडा येथे सभा घेतल्या. या सभांमध्ये उमेदवार संदीप जोशी यांच्यासह खासदार सुनील मेंढे, चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी मंत्री आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार तथा प्रदेश सचिव संजय पुराम, गोंदिया जिल्हा भाजपा अध्यक्ष केशवराव मानकर, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, नेतराम कटरे, जनता शिक्षक महाराष्ट्र संघाचे उल्हास फडके, अनिल शिवणकर, अरुण पारधी, आल्हाद भांडारकर, देवरी नगरपंचायत उपाध्यक्ष आफताफ शेख, अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर, तालुका निवडणूक प्रभारी रचनाताई गहाणे, जिल्हा संयोजक लायकराम भेंडारकर, उमाकांत ढेंगे, रत्नाकर बोरकर, विजयाताई कापगते, बाळाभाऊ अंजनकर, ‘वेस्टा’चे अध्यक्ष सीताराम अग्रवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार सुनील मेंढे पुढे म्हणाले, मागील पाच वर्षामध्ये विदर्भातील सर्वच भागांमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वच ठिकाणी विविध विकासकामांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने विदर्भात विकास कामांचा धडाका लावला. त्याचेच फलित म्हणून विधानसभा निवडणुकीत भाजपा ला राज्यात १०५ जागांसह बहुमत मिळवता आले. मात्र युती करून निवडणूक लढवणाऱ्या मित्र पक्षाने दगा देत पक्षाचा विश्वासघात केला. पुढे तिघाडी सरकारच्या माध्यमातून विदर्भातील निधी कपात करून, परत घेऊन येथील जनतेचाही विश्वासघात केला. अशा या विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याची संधी पदवीधर निवडणूकीच्या माध्यमातून आली आहे. ती न गमवता आपला पहिला पसंतीक्रम संदीप जोशी यांना द्या, असेही आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
पदवीधरांची निवडणूक ही जाणकारांची निवडणूक आहे. मात्र आनेक पदवीधरांचे मत अवैध होण्याचेही प्रकार घडतात, त्यामुळे आपले मत योग्यच असावे याची काळजी घ्या. उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम 1 हा योग्य प्रकारेच लिहा. स्वतःचे पेन घेऊन जाऊ नका मतदान केंद्रावरीलच पेन वापरा. अवैध मतदान टाळले जावे, यासाठी इतरांनाही याची माहिती द्या, असे आवाहन भाजपा व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवारावर संदीप जोशी यांनी केले. पदवीधर, बेरोजगारांचे प्रश्न, शिक्षकांची पेन्शन अशा विविध प्रश्नांसाठी सदैव संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवरी येथील शिक्षक व पदवीधर मतदार मेळाव्यामध्ये जनता शिक्षक महासंघाने भाजप व मित्रपक्षाचा उमेदवार म्हणून संदीप जोशी यांना समर्थन दिले.
गोवारी बांधवांच्या स्मृतीला वंदन
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी स्वतःच्या स्वतःच्या न्याय, हक्कासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काढण्यात आलेल्या गोवारी समाजाच्या मोर्चामध्ये ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या दुर्दैवी घटनेत देवरी येथील शारदाबाई सरवरे ह्या सुध्दा शहीद झाल्या. संदीप जोशी यांनी आदिवासी शहीद स्मारकाला अभिवादन करून सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.