मुंबई,दि.१५(वृत्तसंस्था)ः– राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे मत मांडले होते. परंतु, आज शरद पवारांनी मुंडेंच्या बाजुने आपली प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळाली. प्रसार माध्यमांशी बोलतांना, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही, यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेबाबत अनेक गोष्टी पुढे आल्यामुळे, आधी त्याची सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. अशी स्पष्ट भूमिका पवारांनी मांडली.
‘आम्ही हस्तक्षेप करणार नाही’
पवार पुढे म्हणाले की, ‘भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते धुरी ही एक-दोन उदाहरण आली नसती तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणे आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावे लागेल. पोलिस विभाग चौकशी करेलच. पण, आमचे यात हस्तक्षेप करण्याचे काहीच कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांचीही माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी. मी काल बोललो ते संपूर्ण नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असे वाटते”, असेही पवार म्हणाले.
प्रफुल्ल पटेल यांनी घरी बोलावली इमरजेंसी मीटिंग
माहितीनुसार, या मुद्द्याविषयी एनसीपी कोर कमेटीच्या नेत्यांची माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरा बैठक झाली होती. यामध्ये पटेल यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जल संसाधन मंत्री जयंत पाटीलही सहभागी होती. या मीटिंगमध्ये मुंडे यांना सध्या पदावरुन न हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण आरोप लावणाऱ्या महिलेवर अनेक आरोप लावण्यात आलेले आहेत.
आरोप करणाऱ्या महिलेवर सातत्याने होत आहेत आरोप
मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप आणि मनसेच्या नेत्याने आरोप लावले आहेत. गुरुवारी भाजपचे नेता कृष्णा हेगडे यांनी महिलेवर हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा आरोप केला. हेगडे यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की, महिलेने त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनीष धुरी यांनीही अंबोली पोलिस स्टेशनमध्ये महिलेविरोधात तक्रार दिली आहे.
महिलेने म्हटले – तुम्हाला वाटत असेल तर मी मागे हटते
या दोन्ही नेत्यांच्या आरोपानंतर महिलेने सोशल मीडियावर एकानंतर एक अनेक पोस्ट लिहिल्या आणि आपला बचाव केला आहे. सोशल मीडियावर महिलेने लिहिले…
- ‘कृष्णा हेगडे द्वारे लावण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि मला समाजात बदनाम करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे आणि मुंडेंच्या विरोधात FIR दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.’
- माझ्या तक्रारीनंतर धनंजय मुंडेंकडून प्रेरित केलेली ही कारवाई आहे. मी कथितरित्या कोणत्याही हनी ट्रॅपमध्ये सामिल नाही. कृष्णा हेगडेने माझ्यासोबत बोलणे सुरू केले होते. त्यांची आणि माझी भेट प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवशी झाली होती.
- ‘एक काम करा, तुम्ही सर्वच निर्णय घ्या, काहीच माहिती नसताना तुम्ही सर्व आणि मला ओळखत असणारेही माझ्यावर चुकीचे आरोप लावत असतील तर तुम्ही सर्व ठरवून घ्या, मीच मागे हटत आहे, जसे तुम्हाला सर्वांना वाटत आहे.’
- ‘जर मी चुकीची असेल तर एवढे लोक आतापर्यंत का आले नाहीत माझ्यासाठी बोलायला. मी मागे हटले तर स्वतःवर अभिमान राहिल की, संपूर्ण महाराष्ट्रात एकटी मुलगी लढत होती. मी तर कोणत्याही पक्षाचे नावही घेतले नाही आणि आता मला मागे हटवण्यासाठी एवढ्या लोकांना यावे लागले. आता तुम्हाला जे काही लिहायचे आहे ते लिहित बसा… गॉड ब्लेस यू’
जेट एयरवेजच्या कर्मचाऱ्यावरही महिलेने लावला आरोप
तपासात समोर आले आहे की, महिलेने 2019 मध्ये जेट एयरवेजचे एक अधिकारी रिजवान कुरैशी यांच्या विरोधातही तक्रार केली होती. या प्रकरणाची अनिश्चितता पाहता सध्या एनसीपी धनंजय मुंडेंवर घाईघाईत कारवाई करणार नाही.
मंत्री धनंजय मुंडेंवर महिलेचा हा आरोप
37 वर्षांच्या एका महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप लावला आहे. तिने सांगितले की, तिने 10 जानेवारीला मुंबई पोलिस कमिश्ननरला पक्ष लिहून सांगितले होते की, मुंडेंनी 2006 मध्ये अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. मात्र मुंडेंनी बलात्काराच्या आरोपाला आधारहिन असल्याचे सांगितले आहे. पण त्यांनी खुलासा केला आहे की, तक्रार करणाऱ्या महिलेच्या बहिणीसोबत ते रिलेशनमध्ये होते आणि त्यांना त्या महिलेपासून दोन मुलं देखील आहेत.