भंडारा,दि.१६ः जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांचा करूण अंत झाला. आठ दिवसानंतरही त्यांच्या कुटूंबाला न्याय न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आजपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले हे आंदोलन 25 जानेवारीपर्यंत राहणार असून यानंतरही कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात नवजात शिशू वॉर्डात 8 जानेवारी रोजी रात्री लागलेल्या आगीत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु या प्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, जिल्हा शल्यचिकीत्सकांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मृतक बालकांच्या कुटूंबाला महाराष्ट्र सरकारकडून 10 लक्ष रुपये मदत देण्यात यावी या मागण्यांना घेऊन 15 ते 25 जानेवारी पर्यंत भाजपच्या वतीने साखळी उपोषण व जनआंदोलन येत आहे. पिडीत कुटूबियांना न्याय न मिळाल्यास सदर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. आंदोलनात आज पहिल्या दिवशी खासदार सुनिल मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिèहेपुंजे, भंडारा जिल्हा प्रभारी संजय भेंडे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, जिल्हा महामंत्री मुन्ना पुंडे, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, हेमंत देशमुख, नितीन कडव, मिलिंद मदनकर, भंडारा शहर अध्यक्ष संजय कुंभलकर यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहे.