जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल

0
44

गोंदिया,दि.30– राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीने नियोजन करा, अशी सूचना केली आहे. यावर भाजपनंतर थेट सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून लॉकडाऊनला जाहीर विरोध दर्शवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे, असे प्रफुल्ल पटेल यांनी गोदिंयात आले असता प्रसारमाध्यमांना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो, असेही पटेलांनी नमूद केले. यामुळे लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका याबाबत दिसत आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल आतापासूनच विरोध केला जात आहे. त्यामुळे आता या विषयावरुन नव्या वादाला तोंड फुटणार असं दिसत आहे.