
कराड, २० सप्टेंबर:-गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं.ते पुढे म्हणाले, ठाकरे सरकारची ठोकशाही बघा, CSMT मध्ये मला धक्काबुक्की केली, ट्रेन मिळू नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवलं. मी त्यांना विचारलं कोणत्या नियमा अंतर्गत अडवत आहेत त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवले. त्या ऑर्डर चॅलेंज केलं ते पळून गेले, ठाकरे सरकारचे पोलीस खोटी ऑर्डर दाखवतात, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात, ठाकरे सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, भगवा रंग सोडून दिला असेल. पण ते मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत.पुढे सोमैय्या मुश्रिफांसंदर्भात म्हणाले की, ‘मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.
सोमैय्या म्हणाले, ‘मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार असं देखील किरीट सोमैया म्हणाले.