
नागपूर,दि.02 : भाजप नेते, माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधींची संपत्ती जमा केली आहे. त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा मी साक्षीदार आहे, अशा आरोप त्यांच्या एका नातेवाइकाने केला आहे. सुरज तातोडे, असे त्या नातेवाइकाचे नाव आहे. तो आमदार बावनकुळे यांच्या पत्नीच्या बहिणीचा मुलगा आहे. ॲड. सतीश उके यांनी आज पत्रकार परिषदेत सुरजला उपस्थित करून आमदार बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याबाबत बावनकुळे यांनी मात्र तातोडे नातलंग असल्याचे सांगत त्याचे मानसिक संतुलन ढासळल्याने तो असे खोटे आरोप करीत असल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे.
आमदार बावनकुळे ऊर्जामंत्री असताना त्यांच्या काळ्या पैशांचे सर्व व्यवहार सुरज तातोडे हेच सांभाळायचे.नागपूर आणि मुंबईतील (Mumbai) बंगल्यांवर सुरज सर्व रक्कम लोकांकडून घ्यायचे आणि बावनकुळे यांच्या सुपूर्द करायचे. दोन वर्षांत अंदाजे १०० कोटी रुपये बावनकुळे यांनी ठेवायला दिले, असा दावाही सुरज यांनी केला आहे. एसजी इन्फ्रा, केकेशी आणि सरस्वती कन्ट्रक्शन या कंपन्यांकडून बावनकुळे यांनी पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केला आहे.