Home राजकीय काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला- जमाल सिद्धीकी

काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला- जमाल सिद्धीकी

0

भंडारा दि.१२: अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला. आमच्याजवळ मेहनत करणारे आणि बुद्धीवान लोक आहेत. संधीचीही कमी नाही. केवळ शिक्षणाचा अभाव असल्याने अल्पसंख्यक समाज मागे आहे. संघटनेच्या माध्यमातून अल्पसंख्यंक समाजाला मजबूत करीत शिक्षणासोबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजबांधवापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भाजप अल्पसंख्यंक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री तारिक कुरैशी, माजी सभापती कलाम शेख, अल्पसंख्यंक आघाडीचे प्रदेश सचिव आबीद सिद्धीकी, प्रदेश उपाध्यक्ष मोसीन खान, कार्यालयमंत्री मुस्ताकभाई उपस्थित होते.
अल्पसंख्यक आघाडीच्या बैठकीसाठी ते सोमवारला भंडारा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्यक समाजामध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न पक्षसंघटनेच्या माध्यमातून करीत आहे. प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करणार असून यासाठी संघटनेतील एक कार्यकर्ता २0 मुलांना दत्तक घेऊन हा प्रयत्न करणार आहे. मुसलमान असल्याचा ठपका ठेवून निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाते, या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्यामध्ये कमतरता आहे. शिक्षित, अनुभव असणारे आणि काम करणारे लोक पुढे येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते. पक्षाकडून प्रत्येकवेळी संधी दिली जाते, असे सांगून भविष्यात अधिकाधिक लोकांचा यात सहभाग कसा राहील? या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजना अल्पसंख्यांक बांधवापर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

Exit mobile version