Home राजकीय अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापतीपदी वंचितच्या सौ.कोडापे तर उपसभापती पदी अपक्ष पुस्तोडे विजयी

अर्जुनी-मोर पंचायत समिती सभापतीपदी वंचितच्या सौ.कोडापे तर उपसभापती पदी अपक्ष पुस्तोडे विजयी

0

वंचित व अपक्षाच्या सहकार्याने पंचायत समिती ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न
अर्जुनी-मोर(संतोष रोकडे),दि.06ः अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाकरीता आज 6 मे रोजी  झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सविता कोडापे व उपसभापतीपदावर अपक्ष होमराज पुस्तोडे यांना भारतीय जनता पक्षाने समर्थन देत काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले.मात्र या यशाच्या माध्यमातूनच वंचित व अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून भाजपने पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे.भाजपकडे सहा सदस्य असतानाही यापैकी कुणालाही उपसभापतीपद न देता अपक्षाला संधी देणे म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही अपक्षांना आम्ही सामावून घेणार असल्याचे संकेत यामाध्यमातून भाजपने दिले आहे.

अर्जुनी मोर पंचायत समितीमध्ये 14 सदस्य संख्या असून यात भाजपचे 6,काँग्रेस 4,राकाँ 2,वंचित 1 व अपक्ष 1 सदस्य निवडून आले होते.त्यात सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिलाकरीता  राखीव असल्याने व भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपने वंचित आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिले.तसेच भाजपकडून बंडखोरी करीत अपक्ष निवडून आलेले होमराज पुस्तोडेंना उपसभापतीपद देत सत्ता आपल्याच हाती राहील असे नियोजन केले.यात काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती.सभापतीपदासाठी वंचितच्या सविता कोडापे यांच्याविरुध्द काँग्रेसच्या भागेश्वरी सयाम रिंगणात होत्या.यात कोडापे यांना 8 तर सयाम यांना 6 मते मिळाली.उपसभापती पदाच्या निवडणुकीत अपक्ष पु्स्तोडे याना 8 व राष्ट्रवादीच्या पुष्पलता दुरुगकर यांना 6 मते मिळाली.निवडणुकीनंतर नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी अर्जुनी-मोर पंचायत समिती क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. निवडणुक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.विजय कुमार सूर्यवंशी,तहसीलदार विनोद मेश्राम,गट विकास अधिकारी विलास निमजे, विस्तार अधिकारी पंचायत राजकुमार ब्राह्मणकर यांनी काम पाहिले.

Exit mobile version