मुंबई,दि.24ः- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोण? हा प्रश्न केल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.
शिवसेनेच्या मावळ्याला उमेदवारी
संजय पवार हा शिवसेनेचे मावळे आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मावळ्याला उमेदवारी दिली आहे. मात्र, यासंबंधीची अधिकृत माहिती लवकरच करण्यात येईल. दोन्ही जागा शिवसेनेच्या आहे, दोन्ही जागांवर शिवसेना लढणार आहे, दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील, असे संजय राऊत म्हणाले.
मावळे असतात म्हणून राजे
संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्षांपासून जिल्हाप्रमुख आहेत. कडवट शिवसैनिक आहेत, ते एक पक्के माळवे आहेत. मावळे असतात म्हणून राजे असतात. आम्ही जे आहेत त्या मावळ्यांच्या जोरावर उभे असतात.
सहाव्या जागेचा चॅप्टर क्लोज
शिवसेनेच्या दृष्टीने सहाव्या जागेचा चॅप्टर क्लोज झाला आहे. आमच्याकडून फाईल आता बंद झाली. आम्ही संभाजीराजेंचा सन्मान ठेवतोय. त्यासाठीच आम्ही त्यांना सहाव्या जागेसाठी आमंत्रण पाठवले होते, त्यांना शिवबंधन बांधायला सांगितले होते, मात्र, त्यांना अपक्ष लढायचे आहे त्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
मतांची काय योजना माहिती नाही
संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. जेव्हा आमच्याकडे प्रस्ताव आला तेव्हा आम्ही गादींचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान ठेवत त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश करा, त्यांना आम्ही सांगितले, असे राऊत म्हणाले.