राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे विधान परिषदेची रंगत आणखीणच वाढणार आहे.
तर भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर शिवेसनेकडून सचिन आहिर आणि आमश्या पाडवी यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडला. त्या बैठकीत रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या दोन्ही उमेदवारांना प्रदेश कार्यालयातून उमेदवारी मिळाल्याचे फोन देखील गेले असल्याची माहिती आहे. आज अकरा ते साडेअकरा दरम्यान हे दोन्ही उमेदवार विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील.
भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर
भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी, काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे.
राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर
विजयासाठी हवी २७ मते
– विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर १० सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ असे एकूण १० आमदार निवडले जाऊ शकतात.
– भाजपचे १०६, आघाडीचे १५२, अपक्ष १३ आणि छोटे पक्ष १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी २७ मते आवश्यक आहेत.
– मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने ५ वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.
– १३ जून रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. मात्र राज्यसभेचा एका जागेचा संघर्ष पाहता, भाजप ५ वी उमेदवारी मागे घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे मतदान होण्याची शक्यता आहे.
– भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. फडणवीस समर्थक सदाभाऊ खोत यांनाही यंदा उमेदवारी मिळाली नाही.