कॉंग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

0
31

तुमसर,दि.10ः- कॉंग्रेसचे नेते जिकडेतिकडे आपला अपमान करतात, अशी खंत व्यक्त करीत कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तथा तुमसर पंचायत समितीचे उपसभापती हिरालाल नागपूरे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफुस समोर आली आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत हिरालाल नागपूरे हे सिलेगाव गणातून सलग तिसर्‍यांदा निवडून आले. त्यानंतर त्यांची उपसभापतीपदावर वर्णी लागली. मात्र त्यांनी बुधवारी अचानक राजीनामा दिला. पक्षाला पाठविलेल्या राजीनामा पत्रात हिरालाल नागपुरे यांनी पंचायत समिती अंतर्गत सभापती, उपसभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सभापतीच्या निवडीनंतर तालुक्यातील काँग्रेस नेते मला वारंवार अपमानित करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे व्यथित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. कॉंग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून वारंवार अपमान सहन करावा लागत असल्याने त्यांच्यावर पक्षाचा राजीनामा देण्याची वेळ आल्याने कॉंग्रेस पक्षात नेमके सुरू काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.