6 वर्षांत राज्यसभा खासदारांच्या संपत्तीत 6 पटीने वाढ!

0
32

महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न गेल्या १० वर्षांमध्ये सुमारे २.२५ पटींनी वाढले आहे. याउलट अवघ्या सहाच वर्षांत मालमत्तेत ६ पटीपर्यंत वाढ करण्याचे कसब महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी साधले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उत्पन्नात १०६५ टक्क्यांनी तर धनंजय महाडिक यांच्या उत्पन्नात १४२ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. डॉ.अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा यांच्या मालमत्तेत ३२९ टक्के तर धनंजय यांच्या पत्नी अरुंधती यांच्या मालमत्तेत ३८८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी नुकतीच निवडणूक होऊन निकाल लागले. यासाठी उमेदवारांनी २०१४, २०१६ व २०२२ मध्ये निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्राच्या अभ्यासातून त्यांच्या व कुटुंबीयांच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,४६,८१५ रुपये होते. २०२२ मध्ये ते २,२५,०७३ रुपये झाले. ८ वर्षांत यात ५३ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. ही वाढ दुपटीपेक्षा कमी असतांना याच काळात नवनिर्वाचित खासदारांच्या मालमत्तेत ६ पटीपर्यंत वाढ झाली आहे.

प्रतापगढी महागड्या वाहनांचे शौकीन
काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उत्पन्नाचे साधन कवितेच्या कार्यक्रमांचे मानधन आहे. कोरोनामुळे कदाचित कार्यक्रम बंद असल्याने त्यांचे २०१६-१७ पेक्षा २०२०-२१ चे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. प्रतापगढींकडे ५,४७,००० रुपयांची टाटा इंडिगो, २९,६३०,५४ रुपयांची फाॅर्च्युनर व ३८,१३,००० रुपयांची एंडेव्हर ही वाहने तसेच ८५ हजारांची घड्याळे आहेत. एलआयसीच्या १५ पॉलिसी असून वर्षाकाठी ६ लाखांचा प्रीमियम भरतात. प्रतापगढ जिल्ह्यात त्यांची शेती, पुर्णियात व्यावसायिक संकुल, दिल्लीत २ घरे, जमिनी आहेत.

कोरोनातही सदस्यांच्या मिळकती वाढल्या
कोरोनाकाळातही या खासदारांच्या उत्पन्नात वाढ झाली. २०१८-१९ आणि २०२०-२१ मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, ६ पैकी ३ सदस्यांच्या उत्पन्नात वाढ, तर तिघांच्या उत्पन्नात घट झाली. प्रफुल्ल पटेल ३४८%, पीयूष गोयल ८८%, तर धनंजय महाडिकांचे उत्पन्न १७% वाढले. अरुंधती महाडिक १४१%, सीमा गोयल २४%, वसुधा बोंडे ९%, तर वर्षा राऊत यांचे उत्पन्न ८% वाढले.