गोंदिया,दि.23ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष(चाबी संघटना)आमदार विनोद अग्रवाल यांनी आज 23 जून रोजी मुंबई येथे माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांच्या पुढाकारात भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे गोंदिया पंचायत समिती सुध्दा भाजपची होणार आहे.तसेच जिल्हा परिषदेचे 4 सदस्य सुध्दा भाजपमध्ये सहभागी होणार हे निश्चित झाले आहे.
विनोद अग्रवाल हे भाजपचे आणि संघाचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत.त्यांनी जिल्हा परिषदेपासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरवात केली.त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सुध्दा भुषवले आहे.त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना गोंदिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली,मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.तो पराभव स्विकारत त्यांनी मतदारसंघात सातत्याने काम सुरुच ठेवले.तसेच भारतीय जनता पक्षामध्ये ऊर्जा निर्माण केली.2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळेल यात असतानाच काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप प्रवेश केल्याने भाजपची उमेदवारी गोपाल अग्रवाल यांना मिळाली आणि विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करीत गोंदिया विधानसभेची निवडणुक चाबी निवडणुक चिन्हावर लढवली.या निवडणुकीत त्यांनी मत्याधिकांनी विजय प्राप्त करीत गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडून येण्याचा इतिहास रचला.त्यांनतंर चाबी संघटना तयार करुन त्यांनी आपले मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी जिल्हा परिषदेचे 4 व पंचायत समितीचे 10 सदस्य निवडून आणले होते.आता त्यांनी भाजप प्रवेश केल्याने गोंदिया पंचायत समितीवर येत्या काळात पुर्णत भाजपचे वर्चस्व राहणार आहे.तर जिल्हापरिषदेलाही बहुमत झाले आहे.विनोद अग्रवाल हे गोरेगाव तालुक्यातील सुर्यादेव मांडोदेवी देवस्थानाचे सचिवही आहेत.