शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये जुंपली:अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच अंतर्गत मतभेद उफाळल्याची चर्चा

0
10

मुंबई-अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेसची मते शिवसेनेकडे वळली, तर मुंबई महापालिका निवडणुकीत आपले कसे, असा प्रश्न काही काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलाय.

एकीकडे अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनाला पाठिंबा दिलाय. मात्र, काँग्रेसमधील विरोधी सुरामुळे आघाडीत बिघाडी होणार का, असा सवाल विचारला जातोय. दरम्यान, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी आमच्यात कसलेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे.

अशी होतेय निवडणूक

अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेनेचे रमेश लटके आमदार होते. मात्र, त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही निवडणूक होतेय. या जागेसाठी शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केलीय, तर भाजपने मुरजी पटेल यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकी आधीच ठाकरे सेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे.

काँग्रेसचा पाठिंबा, पण

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

3 नोव्हेंबरला मतदान

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेची रंगीत तालीम म्हणून पक्षाने या लढतीकडे पाहायला सुरुवात केलीय. त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा आहे.

महापालिकेत नुकसान

अंधरे पोटनिवडणुकीत शिवसेना पाठिंबा दिला, तर त्याचा महापालिका निवडणुकीवर परिणाम होईल. काँग्रेस मत महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे वळले, तर कसे, याची चिंता पक्षाच्या अनेक नेत्यांना सतावते आहे. त्यामुळे या पाठिंब्याला त्यांनी विरोध केल्याचे समजते.