
– भाजप कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा
गोंदिया : आपला पक्ष फक्त निवडणूक जिंकणारा नसून शेतकरी, कामगार व जनतेचे हृदय जिंकणारा असायला पाहिजे. मी एकटा हे सर्व करू शकणार नसून मला आपली साथ व सहकार्य हवे आहे. गाव, बुथ वार्डातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता कार्य करावे लागेल. भारतीय जनता पार्टी लोकाभिमुख पक्ष असून जनतेच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याकरीता जोमाने कार्य करा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
ते १० ऑक्टोबर रोजी येथील श्री जलाराम लॉन मध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळ्यात बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यात प्रामुख्याने खा.सुनिल मेंढे, खा.अशोक नेते, आ.डॉ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार रमेश कुथे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, सभापती रूपेश कुथे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, लायकराम भेंडारकर, मदन पटले, सुभाष आकरे आदि उपस्थित होते. पालकमंत्री मुनगंटीवार यांचे यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला.
ना.मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले, इतर राजकीय पक्ष व भारतीय जनता पार्टी मध्ये मोठे फरक आहे. इतर पक्षात मी व माझे कुटूंंब असे चित्र आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी ‘माझा देश-माझे कुटूंब’ असे सांगतात. पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद च्या विचाराने आपण पुढे जात असून श्रध्देय लक्ष्मणराव मानकर यांच्या काळापासूनच गोंदिया जिल्हृयाचे संघटन हे सुरूवातीपासूनच आदर्श राहिलेले आहे. कार्यकर्त्यांनो मोठ्या मनाने कार्य करा, चिंतन करा, मंथन करा, आपली रेष मोठी करा. मोठ्या विपरीत प्रवाहात कार्यकर्त्यांनी काम करून आपण इथपर्यंत आलो आहोत. जिल्हृयाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी पूर्ण शक्तीनिशी काम करणार असून तुमच्या पाठिशी सदैव उभा राहणार आहे. आजघडीला महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणून लोकांच्या मना-मनात पोहोचविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
लवकरच पालकमंत्री कार्यालय येथे सुरू होणार असून आपले निवेदन देताना त्यावर आपले संपर्क क्रमांक व पत्ता अवश्य लिहावे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले. याप्रसंगी खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.
गोंदिया आगमनावर भव्य स्वागत
जिल्हृयाचे पालकत्व स्विकारल्यानंतर ना.सुधीर मुनगंटीवार यांचे काल (ता.१०) प्रथमच गोंदिया जिल्हृयात आगमन झाले. दरम्यान शहरातील फुलचूर नाक्यावर त्यांचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले. ढोल, ताशे व आतिषबाजीच्या गजरात पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
०००