बुलढाणा-भारत जोडो यात्रेतून पुन्हा एकदा नवा इतिहास साकारला जातोय. विशेष म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने नेहरू आणि गांधी परिवार एकत्र आलेला पाहायला मिळाला. राहुल गांधी यांच्यासमवेत आज महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यात्रेत सहभागी झाले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात आहे. शेगाव येथे राहुल यांची आज दुपारी साडेचारच्या सुमारास सभा होणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी आणि तुषार गांधी एकत्र आलेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधी-नेहरू परिवाराचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्यात अपार स्नेह होता. दोघांनीही हातात हात घालून काम केले. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत आज तोच योग जुळून आला. गांधीजींचे पणतू तुषार गांधी या यात्रेत सहभागी झाले. त्यांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. तसेच ते त्यांच्या हातात हात घालून चालले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाली.

तुषार गांधी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने भारत जोडो या ट्विटर हँडलवरून त्यांचे काही फोटो ट्विट करण्यात आले. तसेच एक संदेश देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, आम्ही योग्य मार्गावर चाललो आहोत, हा त्याचाच संकेत आहे. भारत जोडो यात्रेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू सहभागी झाले. राहुल गांधी यांची भेट घेत त्यांनी भारत जोडो यात्रेला आपले समर्थन असल्याचे सांगितले.