सात वर्षाची चिमुरडी कोमल राजीव साठे, शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीत उठून कामाला लागली होती. पत्रे बांधून बनवलेल्या छोट्याशा घराच्या अंगणात साफसफाई केली. नंतर दारात सडा टाकून रांगोळी साकारण्यात मग्न झाली. तिने “सुस्वागतम भारत जोडो” असे रांगोळीत कोरले होते. शेगावपासून सहा किलोमीटरवरील खेर्डी (ता. खामगाव) या खेडेगावातील प्रत्येक दारासमोर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भारत जोडो यात्रा याच रस्त्यावरून जाणार हे ऐकून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कोमल, जयश्री साठे, प्रिया उंबरकर या राहुल गांधींना पाहण्यास, भेटण्यास खूप उत्सुक होत्या. अशाच रांगोळ्या प्रत्येक घरासमोर दिसत होत्या आणि राहुल गांधींच्या स्वागतासाठी महिला मुलाबाळांसह हाती फुले घेऊन दारात उभ्या होत्या.
India is coming together,
India is celebrating its unity in diversity,
India is rooting out hate with love and harmony.#BharatJodoYatra pic.twitter.com/ALcXSmS45J— Bharat Jodo (@bharatjodo) November 19, 2022
१९ नोव्हेंबरच्या पहाटे बालगोपालांसह गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भारत जोडो यात्रा सकाळी सहा वाजता शेगाव येथून जलंबकडे निघाली. बाजार समितीपासून सुरुवात झालेल्या या यात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. दिवंगत इंदिरा गांधी यांच्या आज साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त असे नियोजन करण्यात आले होते. खेर्डी येथे आज सकाळी साडेसातला यात्रा दाखल झाल्यावर फुलांच्या वर्षावात राहुल गांधीं यांचे स्वागत करण्यात आले.
Being led by women from all walks of life, today's #BharatJodoYatra signifies courage, strength & the ability to tackle any challenge with compassion.#ShaktiWalk pic.twitter.com/pnvvQRhesk
— Congress (@INCIndia) November 19, 2022
जलंब येथे दहा वाजता यात्रेचे स्वागत झाले. विध्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर मैदानात स्वागतासाठी रांग लावली होती. काही ठिकाणी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली मुले इतिहासाची आठवण करून देत होती. अभिरा अभय गोंड ही तीन वर्षीय बालिका बालशिवाजीची वेशभूषा करून तलवारीसह घोड्यावर बसली होती. बाजूला सहा मावळे होते. तीन पिढ्यापासून राजकारणात असलेल्या कळसकर परिवारातील काँग्रेस नेते ८६ वर्षीय शाळीग्राम कळसकर यांच्यासाठी आजचा दिवस ‘सोनियाचा दिनू’ ठरला! त्यांना आपल्या पक्षाच्या भावी नेत्याचे जवळून दर्शन झाले. नांदुरा येथील शिवाजी हायस्कुलमधील मुलीच्या लेझीम पथकाने स्वागताची रंगत वाढविली. खामगावच्या रुक्मिणी भजनी मंडळाने विठ्ठल रखुमाई देखाव्यात “बेटी बचाव” भजन सादर करून जनजागृती केली. राणा लकी सानंदा शाळेच्या मुलांनी आदिवासी नृत्य सादर केले. या प्रत्येक बालकाला प्रतिसाद देत व देखावे पाहत राहुल गांधी पुढील मुक्कामी रवाना झाले.
LIVE: Evening leg of the #BharatJodoYatra resumes from Buldhana district, Maharashtra. https://t.co/zT0xOTiX91
— Congress (@INCIndia) November 19, 2022