Home राजकीय विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले- आमच्याकडे देण्यासाठी फक्त प्रेम, 4 फेब्रुवारीला सर्व प्रश्नांची...

विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले- आमच्याकडे देण्यासाठी फक्त प्रेम, 4 फेब्रुवारीला सर्व प्रश्नांची उत्तरे देणार

0

नाशिक – पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. आमच्याकडे देण्यासाठी एकच गोष्ट आहे ते म्हणजे प्रेम, मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिले. त्यामुळे 4 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली.नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी दणदणीत विजय मिळवला. या निकालानंतर गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. निकाल लागल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

या प्रश्नांना प्राधान्य

सत्यजीत तांबे यांनी सांगितले. यापुढे माझ्यापुढे प्राधान्याने उत्तर महाराष्ट्रातील तरुणांचे शिक्षण, रोजगार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल सुविधा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न प्राधान्यावर असतील.

बाद मतदानामुळे मताधिक्य कमी

या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी हा मतदारसंघ गेली 14 वर्षे सांभाळला. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. मतदान बाद होण्याचे प्रमाण मोठे आहे. बाद मतदानामुळे माझे मताधिक्य कमी झाले. निवडणुकीची प्रक्रिया क्लिष्ट होती. त्यामुळे काही प्रमाणात मतदान करतानाही चूका झाल्या.

यशामुळे समाधानी

सत्यजीत तांबे पुढे बोलताना म्हणाले, मतांची टक्केवारी कमी झाली. सोमवारचा दिवस वर्किंग डे होता. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाहीत. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत. पण मिळालेल्या यशामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरते केले आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचे केले.

नेमके काय झाले नाशिकमध्ये?

गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला.

मित्राचे निधन, जल्लोष नाही

दरम्यान सत्यजित तांबे यांनी विजयाचा जल्लोष केला नाही. याबाबत काल त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. ते म्हणाले, विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत. पण विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव करणार नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी 3 ते 7 फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरून केले आहे.

Exit mobile version