Home Top News रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल:अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सांभाळली मंत्रीपदाची जबाबदारी; नगरसेवक ते...

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल:अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सांभाळली मंत्रीपदाची जबाबदारी; नगरसेवक ते आतापर्यंतचा प्रवास

0
The Governor of Tripura, Shri Ramesh Bais calling on the Union Home Minister, Shri Amit Shah, in New Delhi on August 09, 2019.

झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर महानगरपालिका, मध्य प्रदेश विधानसभा आणि नंतर लोकसभेत प्रतिनिधित्त्व केलेले रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते.

रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. सामाजिक जीवनाला सुरुवात करून राजकारणात आल्यानंतर रमेश बैस 1978 मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते.

चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांशी संबंधित काही खास गोष्टी:

नगरसेवक-केंद्रीय मंत्री ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास

  • रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला. 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.
  • 1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
  • 1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला आणि संसदेत आपले स्थान निर्माण केले.
  • छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले.

पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात रमेश बैस यांनी देशाचे केंद्रीय मंत्री म्हणूनही अनेक खाती सांभाळली आहेत, ती पुढीलप्रमाणे:

  • मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
  • ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
  • सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  • जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
  • जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय

लोकसभा निवडणुकीत रमेश बैस चार वेळा नशीब आजमावले असून, त्यात ते तीनदा विजयी झाले आहेत. यानंतर रमेश बैस यांची 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2021 मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या नंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभळणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. त्या बरोबरच 13 राज्यांच्या राज्यपाल पदी नियुक्त्या केल्या आहेत. त्या खालील प्रमाणे-

  1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल म्हणून
  2. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य
  3. झारखंडचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन
  4. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला
  5. आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया
  6. आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची
  7. आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून
  8. छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून
  9. मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून
  10. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून
  11. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  12. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  13. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version