वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्वरित पंचनामे करून मदत द्या : बडोले

0
9

गोंदिया- जिल्ह्यासह अर्जुनी मोर तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून विजेच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात शेतपिकांचे व घरादारांचे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांची स्थिती लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानग्रस्त शेतीची व पडझड झालेल्या घरांची पहाणी करुन व पंचनामे तयार करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर करून केली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी गोंदिया जिल्ह्यासह अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतील शेतकरी यांनी उन्हाळी धानपिकाव्यतीरीक्त मोठय़ा प्रमाणात मका पिकांची लागवड केली आहे. आता पयर्ंत शेतकर्‍यांसाठी सर्व आलवेल असताना व मका आणी धान पिके एकदम तोंडावर आले असून, निघण्याच्या मार्गावर असताना गेल्या आठ दिवसांपासून अर्जुनी मोर. तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात गारपिट, विजेच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान व मका पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुर्ण:ता खचला असून, शेतकरी यांना सावरण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीची व पडझड झालेल्या घरांचे त्वरीत पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ही माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.
अर्जुनी मोर तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अर्जुनी मोर. तालुक्यात उन्हाळी धान पिके व मका पिके निघण्याचे मार्गावर असताना या वादळी पावसाच्या प्रकोपामुळे उन्हाळी धान पिकांचे, मकापिक, मिरची पिकासह ईतर ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतक-यांवर नैसर्गिक संकट उदभवले आहे.
अर्जुनी मोर तालुक्यात एप्रिल महिन्यात ८५:९३ हेक्टर शेतजमीनीतील धान पिक व मका पिके नुकसानग्रस्त झाले आहेत. तर २ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १३७ अंशत: घरे तर २0 गोठे पडली आहेत.आजच्या या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या सर्वांचे तातडीने पंचनामे करुन लवकरात लवकर मदत द्यावी असी मागणी ही माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे.