‘भारत जोडो’नंतर आता काँग्रेसची ‘जनसंवाद पदयात्रा’

0
5

नागपूर,दि.23– अगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस चांगलीच अॅक्टिव झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसच्या वतीने ३ सप्टेंबर पासून ‘जनसंवाद पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहराच्या भागात जाणार, असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.या संदर्भात पटोले यांनी पुर्व विदर्भातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, राजेंद्र मुळक, आमदार रणजित कांबळे, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, प्रतिभाताई धानोरकर, सहशराम केरोटे, राजु पारवे, सुधाकर अडबोले, सुभाष धोटे, माजी मंत्री अनिस अहमद, नाना गावंडे यांच्यासह राज्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलतना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला. पटोले म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने या देशाची जी माती केली संविधानिक व्यवस्थेला संपवले या देशाला बेरोजगारांचा देश बनवला, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला परावृत्त केले आहे, असे गंभीर आरोप त्यांनी केले.शेतकऱ्यांना फसवले जात आहे, या सगळ्या गोष्टीची पोल खोल यात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. आता त्यांच्याजवळ कुठलेही चेहरे बाकी राहिलेले नाही. भाजप जवळचे सगळे चेहरे संपले आहे.भाजपचा खोटारडेपणाचा बुरखा फाटलेला आहे. त्यामुळे मुद्द्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे आणले त्यावर कोणीही विश्वास करायला तयार नाही, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

महागाई वाढवली, मुठभर लोकांसाठी हा देश चालवला जात आहे. या सगळ्या गोष्टींची जनतेमध्ये चीड आहे. त्यांच्या भावना समजून काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. या सरकारच्या योजना कशा बोगस आहेत. जनतेला लुटून व्यापारी लोकांना मोठे केले जात आहे. डीजल, पेट्रोलवर शेतकऱ्यांच्या नावाने कर घेतला जातो. वेगवेगळ्या मार्गाने पैसे जमा केले जात आहेत. अठरा कोटीचा रस्ता अडीचशे कोटीमध्ये कसा केला जातो. हे कॅगच्या रिपोर्ट मधून समोर आले. ज्याचे अध्यक्ष प्रधानमंत्री आहे, त्यांचे सरकार आणि मंत्री कसे भ्रष्टाचारी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.