
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपने जातीनिहाय जनगणनेला पाठबळ द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. मिटकरी म्हणाले, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. नेहरूजींच्या काळात ती होत होती, नितिश कुमार यांनी ती करून दाखवली. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीचा लोकसंख्येत किती वाटा आहे हे कळेल व आरक्षणाचा तिढा सुटेल, त्यासाठी भाजप आणि संघाने समर्थन करण्याची गरज आहे.
सरकार २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षणाबाबत न्याय देईल. उद्धव ठाकरेंशी काल झालेल्या भेटीसंदर्भात ते म्हणाले की, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचा एक मानसन्मान आहे. म्हणून त्यांना मी नमस्कार केला, त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. काही गोष्टी प्रकट करायच्या नसतात. उद्धव ठाकरेंनी माझ्याशी आपुलकीचा संवाद केला, वैयक्तिक संवाद होता. मी मंत्र स्वीकारणारा माणूस नाही, हा पारिवारिक संवाद होता, असे मिटकरी म्हणाले.