निरीक्षकासमोर बाहेरचा व रिपीट उमेदवार नको,पण स्थानिकच हवा…भाजप पदाधिकाऱ्यांचा सुर

0
37

गोंदिया : येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या बाबतीत चर्चा करण्याकरीता निरीक्षक नेमले होते.या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात स्थानिकच उमेदवार हवा.भंडारा-गोंदिया जिल्ह्याबाहेरचा नको असा सुर 70 टक्के उपस्थितांनी व्यक्त केल्याची चर्चा समोर आल्याने निरीक्षकांसमोर पेच निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.निरीक्षकांकडे मात्र गेलेल्या नावामध्ये विद्यमान खासदार सुनिल मेंंढे,माजी आमदार डाॅ.परिणय फुके,माजी आमदार हेेमंत पटले,माजी.जि.प.अध्यक्ष व भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक प्रमुख विजय शिवणकर,ब्रम्हानंद कुरंजेकर,इंजि.राजेंद्र पटले यांचा नावाचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.त्यासोबतच महिला पदाधिकायानी पुरुषच उमेदवार का, महिलांना संधी का नाही? अशी भूमिका सुद्दा मांडल्याची माहिती समोर आली आहे.

भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्याचा भाग येत असल्याने जिल्ह्यातील लोकांची उमेदवार कोण यावर चर्चा सुरु असते.त्यातच गुरुवारी (२९ फेब्रुवारी) भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील होटल तुली येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी करण्यासाठी भाजपचे लोकसभा निरीक्षक पोचले होते.यामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांचा समावेश होता.

या दोन्ही निरीक्षकांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसंदर्भात दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष,उपाध्यक्ष,जिल्हा सचिव,तालुका अध्यक्ष,जिल्हा आघाडीचे अध्यक्ष,आजी माजी आमदार खासदार,माजी जि.प.अध्यक्ष यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील कोअर कमिटी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.त्यात दिवसभरात भाजपचे प्रमुख पदाधिकारी, तसेच वेगवेगळ्या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुसार हे निरीक्षक आपला गोपनीय अहवाल प्रदेश भाजपला सादर करणार आहेत. सुमारेे 60 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते,त्यापैकी 40 च्यावर उपस्थितांनी भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार बाहेरचे पार्सल नको,पण उमेदवार रिपिट पण करु नये अशी भूमिका दोन्ही जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे सुुत्रांनी सांगितले.दुपारी 12 ला सुरु झालेली ही निरीक्षकांची बैठक सायकांळी 5 च्या सुमारास संपली.भंडारा- गोंदियात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने आरएसएसचा कार्यकर्ता असलेल्या नवख्या उमेदवाराला तिकिट देत मोदी लाटेत गड सर केला. सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पक्षाची ही एक प्रक्रिया असली, तरी अंतिम निर्णय दिल्लीतच होणार असल्याने भंडारा- गोंदियाची भाजपच्या तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

2016 पुर्वी भाजप मध्ये नेते लहान व संघटना मोठी होती, आता या उलट नेते मोठे व संघटना लहान झाल्याची खंत भाजपच्या जुन्या नेतेमंडळींकडून व्यक्त केली जात असून बाहेरचा उमेदवार जिल्ह्यावर लादू नये असेही अप्रत्यक्षपणे निरीक्षकांना भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.पाच वर्षातील विद्यमान खासदार यांच्या कार्यप्रणालीवर व माजी राज्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात दोन्ही जिल्ह्यात वाढीस घातलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे प्रत्येक गटाकडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्नही केला गेला यात शंका नाहीच.