रामदास तडस विजयाची हॅट्रिक करणार? भाजपाकडून वर्धेतून उमेदवारी जाहीर

0
2

वर्धा,दि.14 : भाजपातर्फे उमेदवार म्हणून घोषणा झालेले रामदास तडस यांच्या कार्यालयात जणू विजयाचाच गुलाल उधळल्या जात आहे. त्यांचे तिकीट कापले जाणार आणि दुसऱ्यास संधी मिळणार, या चर्चेस उधाण आले होते. मात्र,विरोधकांना चित करुन खासदार रामदास तडस यांनी आपले राजकीय वजन सिध्द केले आहे.विशेष म्हणजे जातीय समीकरणात तेली समाजाला विदर्भातून उमेदवारी देतांना भाजपला एक उमेदवार देणे आवश्यकच होते,त्यामुळेच तडस यांच्यावर पुन्हा शिक्का मोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.तडस यांची उमेदवारी जाहीर झाल्याने विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी समाजाचाच उमेदवार भाजप देणार हे निश्चित झाले आहे. माजी खासदार सुरेश वाघमारे यांनीही यावेळी जोरदार फिल्डींग लावलेेली होती.मात्र त्यांना मधल्या काळात पक्षातील काही कार्यक्रमात झालेल्या गोंधळाचा फटका बसल्याची चर्चा आहे.

तडस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले आहे की पक्षाचे कर्तेधर्ते त्यांना साथ देणार, असा त्यांना विश्वास होता, तो सार्थ ठरला. आता या संधीचे सोने झाल्यास विक्रम घडू शकतो. म्हणजे १९५७, १९६२, १९६७ असे सलग तीन वेळा कमलनायन बजाज हे वर्धा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर १९८०, १९८४, १९८९ असे तीन वेळा वसंत साठे खासदार झाले. आता २०१४ व २०१९ असे दोन वेळा खासदार झालेले तडस तिसऱ्यांदा खासदार होण्यास सज्ज आहेत. तीन वेळा खासदार होणारे तिसरे खासदार, असा बहुमान मतदार त्यांना देणार का, हा आता उत्सुकतेचा भाग ठरत आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस यावेळी आपला कुठला उमेदवार रिंगणात उतरवते,याकडेही लक्ष लागले आहे.महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसून काँग्रेसमध्येही एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे.