धानाची उचल करून रब्बी हंगामातील धानाची खरेदी करा-आमदार कोरोटे

0
9

राज्याचे प्रधान सचिव रणजीत देओल यांना निवेदन दिले

देवरी,दि.०८- गोंदिया जिल्ह्यासह आमगाव विधानसभा मतदार संघातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे गोडाऊन धानाने फुल्ल भरून आहेत. याशिवाय उघड्यावर लाखो टन धान पडून आहे. या धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. याशिवाय शेतकऱ्यांकडील रब्बी हंगामातील धानाची खरेदी करावी, अशा आशयाचे निवेदन आमगाव देवरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सहसराम कोरोटे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह  देओल यांना भेटून आज (दि.८) रोजी निवेदन देत मागणी केली.

गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाद्वारे शेतकऱ्यांनी उत्पादित केल्याची धानाची हमी भावावर खरेदी केली जाते. चालू हंगामात शेतकऱ्यांकडून धानाची मोठ्याप्रमाणावर खरेदी या दोन्ही संस्थाच्या माध्यमातून करण्यात आली. या धानाच्या भरडाई संदर्भात शासन आणि राईसमिल मालक यांच्यात करार होऊ न शकल्याने यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या संपूर्ण धान गोदाम आणि उघड्यावर पडून आहे. समोर पावसाचे दिवस आहेत. आणि या धानाची उचल झाली नाही तर या धानाची नासाडी होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय खरेदीला सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाल्याने या धानसाठ्यामध्ये मोठी तूट येण्याची शक्यता सुध्दा आहे. त्यामुळे शासनाने धानाची घट-तुट मान्य करून धानाची त्वरीत उचल करण्याची व्यवस्था करावी व होणारे कोट्यवधींचे नुकसान रोखावे, अशी मागणी श्री. कोरोटे यांनी आपल्या निवेदनातून शासनाला केली आहे.

शिवाय या धानाची वेळेत उचल झाली, तर शेतकऱ्यांच्या घरी पडून असलेला रब्बी हंगामालातील धान शासनाला खरेदी करता येईल. परिणामी, शेतकऱ्यांचे हित बघता शासनाने या विषयी गांभीर्याने विचार करून रब्बीच्या धानाच्या खरेदीचे नियोजन करावे, अशी विनंती श्री कोरोटे यांनी सरकारला केली आहे.