Home Top News मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले

मतदानाच्या दिवशीच निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले

0
12
मुंबई,दि.२०- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदान केल्याशिवाय घरी न जाण्याचं आवाहन केलं आहे.

“आज २० तारीख आहे. आपण अशावेळेला भेटतोय की, महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार आहे. मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेत आहे. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा-दहा, बारा-पंधरा मेसेज जात आहेत की, मतदान करा म्हणून. त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत. खूप गर्दी दिसत आहे. पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.

“मतदारांमध्ये उत्साह आहे. पण निवडणूक आयोगाचे तथाकथिक प्रतिनिधी हे मतदान केंद्रात बसले आहेत, त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांच्या ठिकाणी नावे दोन ते तीनवेळा तपासले जात आहेत. एकतर ज्येष्ठ मतदारांना आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास झालेला आहे. इतरही मतदारांना त्रास झालाय. यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय’, ठाकरेंचा गंभीर आरोप :  “मला असं वाटतंय, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.