मेंढेना राष्ट्रवादी आमदारांच्या क्षेत्रात पिछाडी,भाजप आमदाराने दिली आघाडी

0
29

गोंदिया :भंडारा-गोंंदिया लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळेंनी भंडारा जिल्ह्यातून ५८ हजाराने घेतलेली आघाडी ही महायुतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना प्रणित अपक्ष आमदाराच्या मतदारसंघातून पराभवाला कारणीभूत ठरली.त्यातही गोंदिया जिल्ह्यातील गोंदियातील अपक्ष व तिरोड्यातील भाजप आमदाराने आपल्या मतदारसंघातून मिळवून दिलेल्या आघाडीने महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढेना कमी मताच्या पराभवाचा फटका बसला.त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय चर्चा व घडामोंडीकडे बघितल्यास निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळेल तिथे महायुतीतील त्या त्या आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा इशारा दिला होता.तो इशारा बघितल्यास भंडारा,तुमसर व अर्जुनी मोरगाव येथील महायुतीच्या उमेदवारांचे आत्ता काय होणार असा प्रश्न चर्चेला येऊ लागला आहे.

२०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मतदार आणि मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, काही मोजक्या लोकांचा कंपू तयार करुन त्यांनाच सोबत ठेवणे आणि इतरांना बाजुला सारणे.पदलालसेमुळे नगराध्यक्षपद कायम ताब्यात ठेवून शहराच्याही विकासाकडे दुर्लक्ष करणे आणि विशेष म्हणजे मतदारांना गृहित धरणे या सर्व बाबी माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पथ्यावर पडल्याचे निकालाअंती दिसून आले आहे.मेंढे यांच्या अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचे प्रशांत पडोळेंना भंडारा विधानसभा मतदारसंघात 22 हज़ार 853 मतांची आघाडी मिळाली.तसेच साकोलीत 27 हज़ार 366,तुमसरमध्ये 9 हजार 16 ,अर्जुनी मोरगाव मध्ये 20 हजार 658 मतांची आघाडी पडोळेंनी घेतली.विशेष म्हणजे यातील तुमसर व अर्जुनी मोरगाव मतदारसंंघात अजीत पवार रााष्ट्रवादी गटाचे आमदार आहेत.तर भंडारा मध्ये महायुतीचे घटक असलेले अपक्ष आमदार असतानाही मेंढेना आघाडी मिळविता आली नाही,याचा अर्थ तुमसर मतदारसंघात माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाने जाहीर केलेल्या समर्थनाचाही परिणाम मेंढेना भोगावे लागले हे सत्य नाकारता येत नाही.२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी वाघमारे मेंढेच्या सोबतीला होते,तर यावेळी मात्र विरोधात होते.

विधानसभा क्षेत्रनिहाय जबाबदारी देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदियात महायुतीतील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची बैठक घेत कामाला लावले होते.मात्र गोंदिया जिल्ह्यातील या तीन विधानसभांपैकी केवळ तिरोडयाचे आमदार विजय रहांगडालेनी ८९३८ व गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल व माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला ३५४९९  मताची आघाडी मिळवून दिली. २०१९ निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढलेले दोन्ही भाजपचे पराभूत गोपालदास अग्रवाल आणि विजयी अपक्ष विनोद अग्रवाल दोघांनीही महायुतीचे सुनिल मेंढेंकरिता मत मागितल्याने भाजप भविष्यात कुणाच्या पारड्यात हे यश घालते ते सुध्दा बघावे लागणार आहे.२०१९ च्या तुलनेत आघाडीत घट झाली असली तरी गोंदिया व तिरोडा येथील आघाडीवरच भाजपच्या उमेदवाराला विजयाची अपेक्षा होती.मात्र आपल्याच मूळ भंडारा जिल्ह्यात आपले पाणीपत होणार याची कल्पना त्यांना आली नसावी.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आजी माजी आमदार असूनसुद्धा तब्बल २० हजार मतांनी सुनिल मेंढे मागे पडले.