काँग्रेसला नेतृत्व नसल्याने मोदी हावी -खा.प्रफुल पटेल

0
15

यवतमाळ : काँग्रेस पार्टीला आज देशात नेतृत्वच नाही, त्यांच्याकडे मोदींना टक्कर देण्यासाठी तसा नेताच नसल्याने भाजपा आणि मोदी हावी होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मंगळवारी यवतमाळात नागरी सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मनोहरराव नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे उपस्थित होते.
खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना आणि सेनेचा पालकमंत्री असताना यवतमाळ बंदची हाक शिवसेनेतर्फे दिली जाते. ते सत्तेत असल्याचे विसरून त्यांना आजही आपण विरोधात असल्याचे वाटते तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी वाल्यांना आपण आजही सत्तेत असल्याचा भास होतो, म्हणूनच आपण कुठेतरी कमी पडत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी पदाधिकाऱ्यांना घेतल्या.

काँग्रेसमुळे राष्ट्रवादीला सुरूवातीपासून मार बसल्याचे सांगून मूळात काँग्रेससोबत जाणे ही मोठी चूक झाल्याची कबुली पटेल यांनी यावेळी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना-भाजपा पेक्षाही मोठा शत्रू राष्ट्रवादीला मानले होते, त्यामुळे ते तर गेलेच शिवाय आपलेही नुकसान करून गेल्याचे ते म्हणाले. विदर्भातील मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे दोघे विदर्भासाठी काय करीत आहेत, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पाच-सात हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मागे गडकरी यांनी यवतमाळात केले, गोंदियातही केले. परंतु अद्याप या कामांचे गोंदियात टेंडरही निघाले नाही सोबतच मिहानचे काम थंडबस्त्यात असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्षात कामांना सुरूवातच होत नसून केवळ गाजावाजाच जास्त होत आहे. या दोन वर्षात कोणत्याही बाबतीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूरांचे ‘अच्छे दिन’आले नाही. सध्या काँग्रेस, सेना व भाजपाची राज्यातील स्थिती पाहता येत्या काळात राष्ट्रवादीला मोठी संधी राज्यात असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, संध्याताई इंगोले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर, जिल्हा परिषद सभापती सुभाष ठोकळ, लता खांदवे, ययाती नाईक, उत्तमराव शेळके, विजय चव्हाण, अनिरुद्ध लोणकर, आशिष मानकर, शबीना बेग आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.