राज्य शासनाच्या विरोधात तालुका कॉंग्रेसचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

0
55

आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात मोर्च्याचे आयोजन.

देवरी,दि.०५: राज्यात वाढते जीवनावश्यक वस्तूंचे दर, बेरोजगारी, हवालदिल शेतकरी, आरोग्याची ढासळलेली स्थिती, ओला दुष्काळ आदी गंभीर विषयांना घेऊन काल शुक्रवारी (दि.४) देवरी तालुका कॉंग्रेसच्या वतीने  राज्य शासनाच्या विरोधात उपविभागीय कार्यालयावर विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याचे नेतृत्व देवरी- आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले. यावेळी आपल्या विविध मागण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे नावे देवरीच्या उपविभागीय अधिकारी यांना सोपविण्यात आले.

या मोर्च्याचे नेतृत्व करण्यांमध्ये जिल्हा कांग्रेसचे अध्यक्ष दिलीपभाऊ बन्सोड,आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक तथा रायपूर (छ.ग.)चे आमदार डॉ. सेवककुमार डेहरीया, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी पुरूषोत्तम बाबा कटरे, जि. प.सदस्य उषा मेंढे, उषा शहारे, गीता लिल्हारे, आमगाव तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुकाध्यक्ष सुनंदा बहेकार,  बळीराम कोटवार,दिपक (राजा ) कोरोटे आदींचा समावेश होता.

देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी,कष्टकरी,सुशिक्षीत बेरोजगार व सर्व सामान्य लोकांच्या प्रमुख मागण्यांना घेवून या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वात देवरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काल शुक्रवारी (दि.४) दुपारी तालुका क्रीडांगणावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्च्यातील प्रमुख मागण्यांत ओला दुष्काळ सरसकट जाहीर करा,घरगुती विद्युत बिलाचे दर कमी करा, तेल-दाळ व जीवनावश्यक वस्तूचे दर कमी करा, गॅस सिलेंडरचे दर कमी करा, ग्रामीण घरकुल योजनेची रक्कम अडीच लाख करण्यात यावी, ग्रामीण रुग्णालय देवरीला १०० बेड व ट्रामा सेंटर सुरू करा, ग्रामीण रुग्णालय देवरीला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, देवरी नगरपंचायत हद्दीत अनेक वर्षा पासून वास्तव्यास असलेल्यांना जमिनीचे प‌ट्टे देण्यात यावे, आमगाव-देवरी वि.स.क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, धानाला प्रती क्विंटल साडेतीन हजार भाव द्यावा,थानाला प्रती क्विंटल एक हजार बोनस अशा विविध मागण्याचा यात समावेश होता. तत्पूर्वी तालुका क्रीडांगणावर आयोजित सभेत पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
या मोर्च्याचे संचालन पं.स.सदस्य रंजीत कासम व सरपंच कमलेश नंदेश्वर यांनी केले.
या मोर्च्याच्या आयोजनकरीत देवरी तालुका काँग्रेस कमिटी, महिला तालुका काँग्रेस कमिटी, युवक तालुका काँग्रेस कमिटी,किसान तालुका काँग्रेस कमिटी, तालुका सेवा दल काँग्रेस कमिटी आणि सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

लाडकी बहीण योजनेच्या नावाआड राज्यशासनाची उधळपट्टी- सहसराम कोरोटे

लाडकी बहीण योजना चांगली आहे. मात्र, सत्ताधारी या योजनेच्या नावाआड आपल्या नेत्याच्या नव्या नामकर

णाचे ब्रॅंडिगवर कोट्यवधीचा निधी पाण्यासारखा नास करीत आहेत. लाडकी बहीण म्हणत अगदी किरकोळ रक्कम त्यांच्या खात्यात टाकून लाडक्या जावयाच्या खिश्यातून दुप्पट तिप्पट रक्कम महागाई वाढवून काढून घेत आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृती, कर्मचाऱ्यांचे वेतन, महागडे गॅस सिलेंडर, वीज दरात प्रचंड वाढ, कंत्राटदारांची देयके, आरोग्य सेवा, नोकर भरती आदी वर दुर्लक्ष करून आणि आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून कोट्यवधींच्या जाहिरातींवर शासकीय निधी उधळला जात आहे. यासाठी राज्य सरकार कित्येक लाख कोटींचा कर्ज घेत राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. अशा या नाकर्त्या सरकारला येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखवावी.