गोंदिया,दि.०७ः- गोंदिया विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार व चाबी संंघटनेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी आज सोमवार ७ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निलंबन मागे घेण्याच्या पत्राबद्दल अभिनंदन करून आभार व्यक्त केले.आमदार अग्रवाल म्हणाले, मी भाजपमध्ये प्रवेश करतोय, अशी संभ्रमाची परिस्थिती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पण मी सांगू इच्छितो की मी कधीही स्वत: भाजप सोडलेली नाही. मी १९८५ पासून भाजपचाच होतो आणि या पुढे ही नेहमीच भाजपचाच राहणार आहे.चाबी संघटनेच्या विलयावर माध्यमांनी विचारणा केल्यावर मात्र त्यावर त्यांनी बोलायचे टाळले.
ते म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काही संधिसाधूंनी भाजप मध्ये येवून सत्तेचे सुख उपभोगण्यासाठी भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही स्वत: संघटित होऊन त्यांना वाचवण्याचे काम केले. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. सर्व वर्ग आणि समाजाच्या आशीर्वादाने आम्ही ती कठीण निवडणुका जिंकल्या आणि लोकप्रतिनिधीत्वाचे सौभाग्यही मिळाले.
ज्या संधिसाधूंनी पक्षात सामील होऊन सत्तेची सुखे उपभोगण्याची स्वप्ने पाहिली होती, ते पराभूत होऊन पक्षाला मागे ढकलत राहिले आणि शेवटी पक्ष सोडून इतर पक्षात गेले. मात्र भाजपपासून दूर राहूनही आम्ही कधीही दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. आपण कालही तेच होतो आणि आजही तेच आहोत.मात्र स्वतःतयार केलेल्या चाबी संघटनेच्या विलयावर मात्र त्यांनी चुप्पी साधल्याने चाबी संघटन हे कार्यरत राहील पण आम्ही भाजपचेच अशी भूमिका मांडली
यावेळी माजी मंत्री परिणय फुके म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत आमदार विनोद अग्रवाल आणि भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, मात्र विनोद भैय्या यांनी पक्षासोबत राहण्याचे वचन नेहमीच पाळले. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून अनेक प्रलोभने आणि मंत्रिपदाचे आमिष देण्यात आले, मात्र त्यावेळीही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सर्व काही प्रलोभने नाकारून राज्यातील भाजप सोबतच राहण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे पक्षांनी आज त्यांचे निलंबन मागे घेतलेले असल्याचे पत्र परिषदेत सांगत त्यांनी २०१९ मध्ये रिंगणात राहावे अशी माझ्यासह सर्वच भाजपच्या वरिष्ठांची भूमिका होती व त्यांना पाठिंबाही होता असे फुके यांनी सांगितले.
या पत्रपरिषदेत आमदार विनोद अग्रवाल यांच्या सोबत माजी मंत्री डॉ. परिणय फुके, भाजपा जिलाध्यक्ष एड. येसुलाल उपराडे, आमदार विजय रहांगडाले, संगठन मंत्री वीरेन्द्र अंजनकर, माजी आमदार केशवराव मानकर,जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, पं.स. सभापति मुनेश रहांगडाले, कृउबास सभापती भाऊराव ऊके,मनोज मेंढे, गजेंद्र फुंडे, अमित झा,राजेश चतुर आदी पदाधिकारी उपस्थित होते.