
नागपूर : महायुतीमध्ये उमेदवारांचा निर्णय जातीच्या आधारावर होणार नाही. तर गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या आधारावर उमेदवारांचा विचार केला जाणार असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाने कधीही जात, धर्माचे राजकारण केले नाही आणि करणार नाही. आमची हिंदुत्वाची भूमिका प्रखर आहे आणि महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. या देशात राहून बांगलादेश व पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांशी आम्ही कधीही जुळवून घेणार नाही. या देशाच्या प्रत्येक हिंदू बांधवाशी आमची बांधिलकी असल्याचे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत असताना मानसन्मान होता मात्र आता आघाडीमध्ये त्यांचे काय हाल होत आहेत, हे जनता पहात आहे. शरद पवारांनी त्यांची काय परिस्थिती केली आहे. आम्ही मान सन्मान दिला मात्र आघाडीसोबत जाऊन त्यांनी पक्षाची माती केली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आघाडीमध्ये मुख्यमंत्री करणार नाही. २०१९ मध्ये त्यांना महायुती फोडायची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. आता त्यांची आघाडीमध्ये उपयोगिता संपली आहे, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.