
* “ओबीसी बहुजन फॅक्टर” काँग्रेससाठी ठरणार नवसंजीवनी
गोंदिया– जिल्ह्यातील ‘हॉटसीट ‘ ठरलेल्या 65 गोंदिया विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार ‘कन्फर्म ‘ झाला नसला तरी काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल यांनी तयारी केली आहे. मात्र आताच्या घडीला महायुतीच्या उमेदवाराच्या तुलनेत त्यांची सर्वच क्षेत्रात पीछेहाट होत असल्याने काँग्रेस ‘ओबीसी बहुजन फॅक्टर ‘ वर जुगार खेळून विजयाचे गणित जुळवणार काय? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा क्षेत्र हा महत्वाचा क्षेत्र आहे. या मतदार संघातून महायुतीने भाजपच्या विनोद अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु भाजप मधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणारे गोपालदास अग्रवाल यांनी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने यात्रा व सभांचा धडाका लावला आहे. असे असले तरी आजच्या घडीला महायुतीच्या भाजप उमेदवाराच्या तुलनेत काँग्रेस चे गोपालदास अग्रवाल सध्या तरी प्रचारात पिछाडीवर असल्याचे जाणवते. त्यामुळे महायुतीतील भाजपच्या उमेदवाराला टक्कर देऊन विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस ने जर बहुजन समाजातील उमेदवाराला उमेदवारी जाहीर करून ‘ओबीसी कार्ड ‘ खेळले तर भाजपला मात्र अडचणीचे ठरणार, यात काही दुमत नाही.
गोंदिया विधानसभा क्षेत्रात 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी चेहरा हवा यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी निवेदनेही दिली होती. त्याचप्रमाणे अनेक ओबीसी संघटना, व इतर संघटनांनी ही ओबीसी उमेदवारीचा आग्रह धरला होता. मात्र भाजपने मागील काही वर्षांपासून भाजप विरोधातच काम करणाऱ्या अपक्ष आमदार विनोद अगरवाल यांना पक्षात घेवून उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांची मने दुखावली आहेत. अशात जर काँग्रेसने प्रचारात मागे पडलेल्या गोपालदास अग्रवाल यांची समजूत काढून ओबीसी चेहरा असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली तर त्याचा फायदा हा निश्चितच काँग्रेसच्या उमेदवाराला होणार यात काही तिळमात्र शंका नाही. एकंदरीत काय तर ‘ओबीसी फॅक्टर ‘ वर काँग्रेसने जुगार खेळला तर काँग्रेसलाच नवसंजीवनी मिळणार एवढे मात्र नक्की.