मातब्बर नेत्यांचे केले भाजपने खच्चीकरण?

0
12

‘वापरा आणि फेका’ तंत्रामुळे शिवणकर,बोपचे,पटले,आस्वले अडगळीत

गोंदिया- गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आणि कार्याचा आढावा घेतल्यास या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला उभारी देण्यामध्ये कुणबी,पोवार,कोहळी या समाजाचा महत्त्वपूर्ण असा वाटा आहे. या समाजाला नेतृत्व करण्याची संधीही भाजपने दिली आहे, हेही खरे आहे. मात्र, राजकारणात भाजप व्यवस्थित सेट होताच पक्षाचा मनुवादी चेहरा समोर आला. ज्या लोकांच्या भरवशावर पक्ष रुजला त्याच समाजातील नेत्यांना आता वाळीत टाकत त्या-त्या समाजात भांडणे लावण्याचे षडयंत्र नागपुरातील मंडळी करीत आहे. परिणामी, वापरा आणि फेका हे तंत्र भाजपचे तंत्र असल्याची भावना आता हळूहळू लोकांना कळायला लागली असल्याचे बोलले जात आहे.

भूतकाळात डोकावून पाहिले तर संघाची कर्मभूमी असतानाही हा पक्ष या दोन्ही जिल्ह्यात जवळपास नामशेष असाच होता. ज्या समाजाकडे पक्षाची कोअर जबाबदारी आहे, त्या समाजातील एकाही नेत्याने या भागात पक्षवाढीचे प्रयत्न केले नाही वा त्यांना ते जमले नाही. यामुळे बहुजन समाजातील काही मोजक्या लोकांना फितवून या लोकांनी या भागात भाजप वाढीसाठी म्होरके हेरले. परिणामी, ओबीसी समाजातील नेते हळूहळू या पक्षात गोळा व्हायला सुरवात झाली. एेंशीच्या दशकापासून भाजपचा आलेख सतत चढता ठेवण्यात ओबीसी समाजातील नेत्यांचा वापर संघातील तथाकथित मनुवाद्यांनी केला.

राज्यात जेव्हा युतीची सत्ता आली, तेव्हा महादेवराव शिवणकरांना मंत्रिपद मिळाले खरे. परंतु, त्याचवेळी त्यांच्या खच्चीकरणालाही सुरवात करण्यात आली. त्यांच्यामागे अनेक गोष्टींचा चांगलाच ससेमिरा लावण्यात आला होता. बहुजन ओबीसीतील कणखर चेहरा म्हणून गोपीनाथराव मुंडे आणि महादेवराव शिवणकरांचीच ओळख होती. शिवणकरांचे वाढते वजन नितीन गडकरींना कधीच आवडले नाही. त्यांनी त्यांच्या खच्चीकरणाला सुरवात केली. त्यातच २००९ च्या निवडणुकीत विधानसभेच्या मतदारसंघाची फेररचना झाली. त्यामुळे भाजप मधील ओबीसी विरोधी कंपूलाला शिवणकरांच्या राजकीय कारकिर्दीलाच ग्रहण लावण्याची संधीच सापडली. त्यांच्यासारख्या मातब्बराला विधानपरिषदेत जाण्यापासून रोखण्यात नागपूरच्या मंडळीला यश आले. प्रा. शिवणकर हे भाजप सोडून बाहेर जाण्यासाठी नाना प्रयोग या मंडळींनी केल्याचेही सांगितले जाते. शिवणकरांना अडगळीत टाकल्यानंतर या जिल्ह्यात त्यांच्यानंतर नंबर लावला गेला तो डॉ.खुशाल बोपचे यांचा. डॉ. बोपचे हे तर अगदी बालपणापासून संघाच्या मुशीत वाढलेले सच्चे कार्यकर्ते होते. त्यांची गत तर नागपुरातील मंडळींनी शिवणकरांपेक्षाही वाईट करण्यावर भर दिला गेला. त्यांनाही आता मतदारसंघातील मतदारांच्या विरोधाचे खोटे कारण समोर करून निवडणुकीत बाद करीत अडगळीत टाकले गेले. गडकरींशी कितीही बोपचेंचे चांगले संबंध असले,तरी ते कामी आले नाही. तरी गडकरी आणि प्रफुल पटेल यांच्या व्यापारी मैत्रीपोटी बोपचेंचा घात झाला, हेही तेवढेच खरे. त्यातही भाजपच्या संघटनमंत्री असलेल्या आशिष वांदिले यांनी तर आधीपासूनच बोपचेंना टार्गेट केले होते. असेही वांदिले हे संघटन मंत्री कमी आणि भांडणतंटेमंत्री म्हणूनच भाजपत ओळखले जातात. परंतु, आता काय करणार, नागपूरच्या तिकडींने ओबीसी आणि पोवार समाजातील मोठ्या नेत्याचेही खच्चीकरण करून टाकले आहे. या आधी माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार हेमंत पटले,मधुकर कुकडे,खोमेश्वर रहांगडाले, हरीश मोरे यांना सुद्धा मोठे लालीपाप देण्यात आले. परंतु, त्यांनाही वाळीत टाकण्यात आले. तीच परिस्थिती माजी आमदार राम आस्वले, हेमकृष्ण कापगते यांचीही आहे. भाजपमधील या मनुवाद्यांनी हेटाळणी करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. दादा टिचकुले, राजेंद्र पटले, नेतराम कटरे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, वसंता एंचिलवार, महेंद्र निबांर्ते, प्रकाश पडोळे अशी अनेकांची नावे आहेत ज्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आणण्यात संघटनमंत्र्याची मोलाची भूमिका आहे.

ज्या भाजपला पूर्व विदर्भात चांगला जम बसवून दिला त्याच भाजपने जर दगा दिला असेल, तर शिवणकर, बोपचे, पटले, रहांगडाले, कापगते, टिचकुले, पडोळे आदींनी सुद्धा संघटित होऊन आपली बहुजन शक्ती त्या संघटनमंत्र्याला नव्हे तर भांडणमंत्र्याला दाखविण्याची संधी या नेत्यांकडे चालून आली आहे.

अन्यथा आताही गप्प बसले समाजातील कच्च्या दुव्यांचा वापर आणि आपल्या पक्षवाढीसाठी केलेल्या श्रमाचा भरपूर वापर करून ही मंडळी मोकळी होईल. आणि पुन्हा नवीन शिवणकर, बोपचे पटले, रहांगडाले, कापगते यांचा बळी घेत ही मंडळी सत्तासुख उपभोगतील आणि ओबीसी समाज हा युगानुयुगे पुन्हा गुलामीत ठेवण्याचा त्यांच्या मनसुब्याला यश येईल.