
तिरोडा/साकोली,दि.23-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामाच्या लोकार्पण व भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या धानाला 500 रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याच्या मागणीवर बोलतांना धानाला बोनस आणि मासेमारांना मदत तिरोडा येथे नाही तर मी सेंदुरवाफा येथील सभेत जाहीर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.त्यानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवापा येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बोलतांना धानाला प्रतीक्विंटल 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली.ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील साकोली व तिरोडा विधानसभा मतदारसंघातील विविध कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकरीता आले असतांना आज(दि.23) बोलत होते.
आमदार विजय रहागंडाले यांनी आपल्या प्रास्तविकात धापेवाडा योजनेचे सिंचन क्षेत्र हे ५०० हेक्टरवरुन 10 हजार हेक्टर झाल्याचे सांगत २०२० पर्यंत तिरोडा विधानसभा मतदारसंघ हा सिचंनात क्रांती करणार असून निधीची असलेली कमतरता पुर्ण करण्याची मागणी केली.तसेच गेल्या १५ वर्षात रखडलेली सिंचनक्रांती अवघ्या तीन वर्षात २७ हजार ८०० हेक्टरवर पोचल्याचे सांगितले.सोबतच निमगाव सिंचन प्रकल्पाचा केंद्रातील प्रश्न सोडविण्याची मागणी करीत धानाला 500 रुपये बोनस देण्याची जाहिर मागणी केली. त्या मागणीचा मुद्दा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकोली तालुक्यातील सेंदुरवापा येथे आयोजित सभेत धानाला बोनस जाहिर केले.तिरोडा येथील कार्यक्रमाला 10 हजाराच्यावर नागरिकांची हजेर होती.संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले व मंजुश्री देशपांडे यांनी केले.