मुंबई,दि.06(वृत्तसंस्था)- माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. सभेत अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचे जाहीर भाषण ऐकले, असे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये आकडेवारी, आर्थिक विश्लेषण नव्हते. अर्थसंकल्पात ताळमेळ दिसला नाही. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असे तीन विभाग येतात याचा राज्य सरकारला विसर पडला आहे, अशी टीका विरोधी फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान अर्थमंत्र्यांनी आमदार विकास निधीत वाढ केल्यामुळे फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या ‘त्या’ वचनाचा भंग केला
फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. कर्जमाफीची घोषणा करत असताना मुदत कर्जाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. पीककर्जाव्यतिरिक्त इतर कोणतेही कर्ज माफ झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी बांधावार जाऊन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र त्या वचनाचा भंग करून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही.